सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईतील तलावांना, उद्यानांना सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी दावा हा पोकळ असल्याचे नवी मुंबईतील तलाव आणि उद्यानांमध्ये फिरताना पहावयास मिळतो. जुईनगरच्या चिंचोली तलावाजवळ महापालिकेचे सुरक्षा रक्षकच नसल्याने शालेय मुलांनी या तलावाचा तरण तलाव केला असून शाळा बुडवून या ठिकाणी मुले पोहण्याचा आनंद लुटत असल्याचे नेहमीच पहावयास मिळते.
शिरवणे विभागातील शालेय मुले सर्रासपणे या चिंचोली तलावामध्ये पोहण्यास येत असतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने दोन विभागामध्ये विभागलेला हा तलाव पूर्णपणे भरलेला पहावयास मिळत आहे. जुईनगर आणि शिरवणेमधील असलेले रेल्वे रूळ ओंलाडून शालेय मुले या तलावाजवळ येतात. शालेय बॅगा आणि कपडे काढून मस्तपैकी पाण्यामध्ये तास न् तास डुंबण्याचा मनसोक्त आनंद ही मुले लुटत असतात. ज्या मुलांना पोहता येते, ती मुले आतमध्ये लांबवर जातात आणि ज्यांना पोहता येत नाही, ती मुले काठाच्या जवळपास गुडघ्याभर पाण्यात पोहण्याचा आनंद लुटतात. पोहणारी मुले न शिकणार्या मुलांना पोहणे शिकविण्याचा कार्यक्रम घेेतात. उद्यानात असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाच्या मागील बाजूस शालेय मुले आपली कपडे व बॅगा ठेवत असतात. पोहून झाल्यावर रेल्वे रूळावर जावून आपले ओले अंग कोरडे करतात आणि नंतर पुन्हा शाळेची कपडे घालून घराच्या दिशेने रवाना होतात. हा या मुलांचा नेहमीचाच कार्यक्रम झाल्याचा माहिती उद्यानातील माणसांनी दिली.
पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्या ठिकाणी प्रशासन सुरक्षा रक्षक देत असल्याचे सांगण्यात आले. जर खरोखरीच सुरक्षा रक्षक तलावांना दिला असता, तर ही शालेय मुले तासन्तास तलावामध्ये कशी पोहतात असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. कागदोपत्री बंदोवस्ताला असणारे सुरक्षा रक्षक काम सोडून जातात कोठे असाही संतप्त सवाल स्थानिक रहीवाशांकडून विचारण्यात येत आहे. तलावाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर गाळ असून जर गाळात मुलांचा पाय अडकल्यास बाहेर पडणे अवघड असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. पोहणार्या मुलांच्या बाबतीत दुर्घटना झाल्यावरच नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग येणार काय असा उद्रेक स्थानिक परिसरातील नागरिकांकडून संभाषणातून व्यक्त होत आहे.