मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणावरील निवेदनावर आमचे तरी समाधान झालेले नाही. मोर्चेकऱ्यांचे सुध्दा किती समाधान झाले याबाबतही साशंकता आहे. निवेदनाच्या प्रतीवर असमाधान व्यक्त करत पुढील काळात या मागण्यांवर ठोस कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आरक्षण वगळता मुख्यमंत्र्यांनी आज ज्या उपाययोजना सांगितल्या त्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले आजचा मोर्चा शांततामय वातावरणात निघाला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व बांधव, भगिनींचे याबद्दल अभिनंदन. मागचे ५७ मोर्चे आणि आजच्या मोर्चातही प्रचंड जनसमुदाय होता. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या कशा मांडायच्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा क्रांती मूक मोर्चा. मुंबई, आझाद मैदानाने आजवर अनेक मोर्चे पाहिले. मात्र इतक्या मोठ्या संख्येने शांततेत निघालेला हा एकमेव मोर्चा असावा.
आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करत असताना आपल्या आर्थिक, शैक्षणिक गरजा कशा पूर्ण कराव्यात याबाबत मराठा समाज जागरूक दिसला. शिष्टमंडळातील भगिनींनी उद्विग्न होत आपल्या भावना आज मांडल्या. हा खुप वर्षांचा उद्रेक बाहेर पडताना दिसला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार असे सांगितले. पण पाच कोटी रुपयांमध्ये किती मुला-मुलींचे वसतीगृह होईल याबाबत साशंकता आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे ३ लाख मुलांचा कौशल्य विकास केला जाईल, पण याची कालमर्यादा काय? ओबीसींच्या सवलतीप्रमाणे मराठा समाजाला सवलती देणार सांगितले. पण आजपर्यंत ओबीसींना तरी सवलती मिळाल्या आहेत का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. राणे समितीचा अहवाल मागासवर्गीय आयोगाला दिला असता तर मराठा आरक्षण कोर्टात टिकले असते.
मराठा मोर्चाच्या मागण्यांपैकी प्रमुख मागणी आरक्षणाची आहे. याबाबतीत मागासवर्ग आयोग नेमण्यात आला आहे,मात्र त्याचे काम सुरळीत सुरु नाही. आज मोर्चेकरांच्या मनामध्ये जो रोष आहे तो राज्यकर्त्यांनी समजून घ्यावा, हीच आमची अपेक्षा आहे असे सुनील तटकरे म्हणाले