पनवेल : वीज ग्राहकांना कणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये असे आदेश देतानाच उत्तरांच्या सरबत्ती करणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात दिले.
पनवेल आणि उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वीजप्रश्नांमुळे नागरिकांना मोठा प्रमाणात त्रास होत असल्याचे बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. वीज ग्राहकांना त्रास होवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी त्यावेळी देतानाच लवकरच पनवेलमध्ये जनता दरबार घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्या अनुषंगाने (दि. 23 ऑगस्ट ) जनता दरबार आयोजित करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पंडित पाटील, महापौर डॉ.कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेतील गटनेते परेश ठाकूर, प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, तसेच महावितरणचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंढे, भांडुप परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्प चव्हाण, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचात लोकप्रतिनिधी, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
वीज पुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा, विद्युत पेटीला झाकण नसणे, अधिकारी योग्य उत्तर देत नाही, पोल तसेच तारा जीर्ण होणे, अशा विविध विजेच्या संदर्भातील समस्या उपस्थित नागरिकांनी मांडल्या. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येकाच्या समस्या ऐकतानाच त्या प्रश्नांवर अधिकार्यांची उत्तरे घेतली. त्यावेळी मोघम उत्तर देणार्या अधिकार्यांची मंत्रीमहोदयांनी चांगलीच झाडाझडती घेतली. खाजगी विकासकांची कामे करण्यापेक्षा जनतेची कामे तत्परतेने करा, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात, हे ध्यानात घ्या अशी तंबीही त्यांनी अधिकार्यांना दिली. तसेच यावेळी कर्तव्यात कसूर करणार्या तीन अधिकार्यांचे दोन महिन्यांचे वेतन कापण्याचे आदेशही त्यांनी दिले. येत्या तीन महिन्यात पुन्हा जनता दरबार घेणार असल्याचे सूचित करतानाच त्यावेळी एकही समस्या शिल्लक राहिल्यास अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा सूचना वजा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बेजबाबदारीपणे वागणार्या अधिकार्यांना कडक भाषेत बोलताना नामदार बावनकुळे नायक या हिंदी चित्रपटातील अनिल कपूर यांच्याप्रमाणे दिसून आले. हा जनता दरबार म्हणजेच व्हॉईस रेकॉर्डर आहे, याची आठवण ठेवा अशा शब्दात अधिकाऱयांचा त्यांनी समाचार घेतला. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच यावेळी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना, विजेच्या प्रश्नांंची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने आपल्याकडे पाठपुरावा केल्याचे आवर्जून नमूद केले.
या जनता दरबारामुळे नागरिकांचे प्रश्न, समस्या व अधिकार्यांच्या भोंगळ कारभाराची उदाहरणे थेट मंत्रीमहोदयांपर्यत पोहचली आहेत, नामदार बावनकुळे यांनी या जनता दरबारात सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहेत, त्यामुळे या जनता दरबारच्या आयोजनाबद्दल नागरीकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.