मुंबई : पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मार्ग ( गोळीबार रोड ) ची अवस्था अत्यंत बिकट असून दोन दिवसांवर गणेशोत्सवाचे आगमन होत असताना पालिकेकडून या रोडवरील खड्डे अद्यापही बुजवण्यात आले नसल्याने बुधवारी ( 23 ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्ड अध्यक्ष प्रतिक खरात, गणेश पवार, सतीश पाटील, प्रशांत पवार, सचिन थोरात, नदीम इनामदार, प्रवीण कळंबे यांच्या उपस्थितीत एन वार्ड महानगरपालिकेचे सहायक अभियंते कौदरे यांना निवेदन पत्र देण्यात आले. शहरात नागरी सुविधा उपलब्द होण्यासाठी पालिका नागरिकांकडून मालमत्ता कर आकारते. या करातून पालिका नागरिकांना सुविधा निर्माण करून देते. मात्र गणेशोत्सव तोंडावर असताना पालिकेने या गोळीबार रोडकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. गणेशोत्सवापूर्वी जर हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर मनविसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा मनविसेकडून देण्यात आला आहे.