नवी मुंबई : फिफा फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून देशभरात फुटबॉल मिशन राबविण्यात येत असून नवी मुंबईत होणा-या 17 वर्षा खालील फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात राबविला जात आहे. यामध्ये फुटबॉल खेळाच्या माध्यमातून खेळातून आरोग्य विकास हे ध्येय नजरेसमोर ठेवले जात असून याकरीता विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व महापालिका शाळांच्या क्रीडा शिक्षकांच्या विशेष बैठकीप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाचे उपसंचालक एन.बी.मोटे, शिक्षणाधिकारी तथा सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे प्रमुख संदिप संगवे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी उपस्थित होते.
राज्यभरात 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल फेस्टीवल आयोजित करण्यात येत असून तत्पुर्वी 1 लक्ष फुटबॉलचे वितरण शाळांना करण्यात येणार आहे. सध्याच्या मोबाईल संस्कृतीपासून मुलांना दूर नेवून त्यांच्यामध्ये मैदानी खैळाची आवड निर्माण करण्याचा व त्या माध्यमातून खेळातून आरोग्य ही संकल्पना रुजविण्याचा मिशनव्दारे प्रयत्न केला जात असल्याचे श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले. 15 सप्टेंबर यादिवशी साधारणत: राज्यभरात 10 लाख मुले फुटबॉल खेळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाचे उपसंचालक एन.बी.मोटे यांनी 15 सप्टेंबर रोजी राज्यभरात अनध्ययन दिन असून या दिवशी शाळांतील सर्व मुले मैदानात खेळण्यासाठी तसेच खेळणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी उतरतील असे सांगितले. याकरीता शाळांनी सकाळच्या सत्रात 8 ते 12 या वेळेत तसेच दुपारच्या सत्रात 3 ते 5.30 या वेळेत 35 मिनिटांचे फुटबॉलचे सामने खेळवावेत असे सूचित केले. 5 मुले व 2 राखीव असा 7 जणांचा 1 संघ असेल व सकाळच्या सत्रात साधारणत: 6 व दुपारच्या सत्रात साधारणत: 4 सामने होतील असे नियोजन असावे व त्याकरीता 30 बाय 20 मीटर आकाराची फुटबॉल मैदाने तयार करावीत अशा सूचना त्यांनी उपस्थित शाळांच्या क्रीडा शिक्षकांना दिल्या.
नवी मुंबईत 17 वर्षा खालील फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धा संपन्न होत असल्याने नवी मुंबई शहरातील वातावरण फुटबॉलमय झाले असून नवी मुंबई महानगरपालिका पुढाकार घेऊन महानगरपालिका शाळांसह खाजगी शाळांमध्येही फुटबॉलचे विविध उपक्रम राबवून स्पर्धेचे यजमानपद जल्लोषात साजरे करेल असा विश्वास शिक्षणाधिकारी श्री संदीप संगवे यांनी व्यक्त केला. 15 सप्टेंबरचा शासनाने जाहिर केलेला फुटबॉल फेस्टीवल दिवस सर्व शाळांतून उत्साहाने साजरा होईलच याशिवाय 20 किंवा 21 तारखेला आंतरशालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फुटबॉल विषयक विविध उपक्रमांचे आयोजन सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिका शाळांनाही फुटबॉलचे वितरण करण्यात येत आहे.
जगातील सर्वाधिक देशात खेळला जाणारा व सर्वात लोकप्रिय असणा-या फुटबॉल खेळाचा फुटबॉल फिव्हर नवी मुंबईत पसरत चालला असून खेळाच्या माध्यमातून आरोग्य संरक्षण व संवर्धन ही शासनाची उद्दीष्टपूर्ती करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रमांच्या माध्यमातून सज्ज आहे.