नवी मुंबई : कोणतीही आपत्ती पुर्वसूचना देऊन येत नाही, मात्र आकस्मिकरित्या आपत्ती आल्यानंतर काय करावे याबाबत त्यावेळी त्वरीत योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने शालेय सुरक्षा व शालेय आपत्ती व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश चव्हाण यांनी या प्रशिक्षणातील माहिती व ज्ञानाचा उपयोग उपस्थित शिक्षकांनी करून घ्यावा व ही माहिती शाळेतील इतर शिक्षक व विद्यार्थ्यांना देऊन त्यांनाही यादृष्टीने अद्ययावत करावे अशी सूचना केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महापालिका शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधींसाठी आयोजित शालेय सुरक्षा व शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अंतर्गत शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व अद्ययावत ठेवणे याकरीता आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी व्यासपिठावर शिक्षणाधिकारी संदिप संगवे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त अनंत जाधव, अग्निशमन अधिकारी प्रभाकर गाढे, ऑल इंडिया डिझास्टर मिटिगेशन इंन्टिट्युट अहमदाबाद येथील तज्ज्ञ व्याख्याते विशाल पाठक, अमित तुतेजा, श्रीम. सोनाली दास व राजदिप बनसोड उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट करीत या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण विषयाबाबतचे प्रशिक्षण सर्वांनी गांभिर्यपूर्वक पूर्ण करावे असे सूचित केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्ती धोके कमी करणे व शालेय सुरक्षा तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी, शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा भाग 1 व 2 अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रश्नोत्तरातून शंका समाधान करणार आहेत.
आपत्ती परिस्थितीत काय करावे याविषयी शिक्षक व विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यानंतर ती शाळा संरचनात्मक दृष्ट्या स्थिर होते हे लक्षात घेऊन यू.एन.डी.पी. ने यू.एस.ए.ए.डी. कार्यक्रमाच्या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेसह “आपत्ती व हवामान बदलानुसार जोखीम कमी करून प्रतिकार करणारी शहरे विकसित करणे” हा प्रकल्प हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना हे दोन दिवसीय प्रशिक्षण दिले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेचा शाळांचा शालेय सुरक्षा व शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याकरीता यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.