नवी मुंबई: नवी मुंबईतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अनेक गावागावात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी गटाराची झाकणेही नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच नवी मुंबईतील नागरिकांना त्यांच्या प्रभागातील विविध नागरी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी तेथील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने १३ सप्टेंबर रोजी ‘बेलापूर’ मतदार संघातील भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली.
यावेळी नवी मुंबईतील गावागावात पसरलेले घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, बेलापूर, नेरूळ आणि ऐरोली येथील हॉस्पिटल, तुर्भे डम्पिंग ग्राऊंड, मंदिरांवरील कारवाई थांबविणे, नवी मुंबईतील तलावांमधील गाळ काढून तलावांची स्वच्छता करणे, विविध प्रभागात मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे, उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिन्या भूमीगत करणे, महापालिकेच्या बहुउद्देशीय इमारतींमध्ये आरोग्य केंद्र, समाज मंदिर, महिलांकरिता बचतगट भवन, व्यायामशाळा, वाचनालय यांसारख्या नागरी सुविधा सुरु करणे तसेच उद्यान विभागामार्फत निघालेल्या निविदा रद्द करून स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना निविदेत सामवून घेणे अशा विविध समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच स्वच्छता गृहे, समाज मंदिर, अनेक प्रभागात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि महापालिका शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीन वेंडिंग मशीन, डिस्पोजल मशीन यांकरिता आमदार निधीमधून तरतूद करुन घेण्याबाबत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर बैठकीत आयुक्तांशी
चर्चा केली.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत नियोजित बैठक होती. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या समस्यांविषयी आपल्याशी चर्चा केली असून, संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले. तर काही विकासात्मक सुविधांकरिता ते त्यांच्या आमदार निधीची तरतूद करणार असून महापालिकाही याबाबत सकारात्मक असल्याचे आयुक्त रामास्वामी यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवा निमित्त गेल्या १५ दिवसात आपण नवी मुंबईतील अनेक ठिकाणी दौरा केला असता गावागावात घाणीचे साम्राज्य असल्याचे पहावयास मिळाले. तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. तसेच अनेक प्रभागातील अनेक समस्यांबाबत तेथील लोकप्रतिनिधींनी आपल्याला निवेदन केले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासोबत चर्चा केल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये स्वच्छता गृहे, समाज मंदिर, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि महापालिका शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीन वेंडिंग मशीन व डीस्पोजल मशीन यांकरिता आमदार निधीमधून तरतूद करण्यात येणार असल्याचेही आमदार सौ. म्हात्रे म्हणाल्या. एकंदरीतच सदर बैठकीमध्ये अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचेही आमदारांनी सांगितले.
सदर बैठकीप्रसंगी ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, कृष्णा पाटील, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेविका उज्वला झंझाड, विकास झंझाड, राजू तिकोने, गजानन पाटील, किशोर नाईक, आदि उपस्थित होते.