नवी मुंबई : शहराचे स्वच्छतेमधील देशातील आठवे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकापर्यंत हे अभियान पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी ज्या ज्या घटकापर्यंत या अभियानाची माहिती पोहोचेल, त्या प्रत्येकाने आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकापर्यंत स्वच्छतेचे महत्त्व् व अभियानाची माहिती पोहचवावी आणि आपल्या शहराला स्वच्छतेत देशात नंबर वन आणण्यासाठी सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री.सुधाकर सोनवणे यांनी केले.
स्वच्छ भारत मिशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त् देशभरात 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर, 2017 या कालावधीत “स्वच्छता हीच सेवा” मोहिम राबण्यिात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरात या मोहिमेच्या शुभारंभ्प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
या प्रसंगी उपमहापौर श्री. अविनाश लाड, महापालिका आयुक्त् डॉ.रामास्वामी एन., स्थायी समितीच्या सभापती श्रीम. शुभांगी पाटील, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेवक श्री. नामदेव भगत, नगरसेविका श्रीम.शशिकला पाटील, घनकचरा व्य्वस्थापन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागाचे उप आयुक्त् श्री. तुषार पवार, परवाना विभागाच्या उप आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, नेरूळ विभागाचे सहा.आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र सोनावणे तसेच इतर मान्यवर आणि एन.आर.भगत विदयालय व महाविदयालयाचे विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपले शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी त्यामध्ये नागरिकांचा संपूर्ण सहभाग असणे सर्वात महत्वाचे असल्याचे स्पष्ट करीत स्वच्छता ही आपली सवय व्हायला हवी असे मत व्यक्त केले. कचरा निर्माण होतानाच तो ओला व सुका असा वेगवेगळा ठेवणे आणि कचरागाड्यांमध्ये देतानाही वेगवेगळा दिला जाणे महत्वाचे असून सोसायट्यांप्रमाणेच गावठाण व झोपडपट्टी भागातही कचरा वर्गीकरणाची सवय नागरिकांमध्ये रूजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या पंधरवड्यात शहराच्या विविध भागात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगाने स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांनी स्वयंपूर्ण सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित एन.आर.भगत विदयालय व महाविदयालयाच्या विदयार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या आवडत्या सोशल मिडीयाव्दारे स्वच्छतेचे संदेश घराघरात पोहचतील व स्वच्छतेची चळवळ उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक नगरसेवक म्हणून श्री. नामदेव भगत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर रोजी श्रमदान करून “सेवा दिवस” साजरा करण्यात येत असून 24 सप्टेंबर रोजी सर्वांना सामावून घेत “समग्र स्वच्छता” विशेष श्रमदानाचे आयोजन करण्यात येत आहे. 25 सप्टेंबर रोजी रूग्णालये, उद्याने, स्मारके, बस थांबे, तलाव व स्वच्छतागृहांमध्ये व्यापक स्वरूपात “सर्वत्र स्वच्छता” मोहीम राबविण्यात येईल. याशिवाय 1 ऑक्टोबर रोजी शहरातील प्रसिध्द स्थळांच्या ठिकाणी “श्रेष्ठ स्वच्छता” मोहीमेचे आयोजन करण्यात येईल. तरी नागरिकांनी आपापल्या प्रभाग क्षेत्रात नगरसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती यांचेसह ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीमेत सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.