सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : अवघ्या ४८ तासावर नवरात्र उत्सव आलेला असतानाच मंगळवार दुपारी १ वाजल्यापासून वरूण राजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नवरात्र उत्सव आयोजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नवरात्र उत्सवासाठी तयारीवर अखेरचा हात फिरविणार्या डेकोरेटर्स मंडळीदेखील चिंतातूर झाली आहे. पाऊसामुळे कामगाराची मजुरी अंगावर येणार असून सांयकाळी ७ नंतर कामगारांना डबल हजेरी द्यावी लागण्याच्या भीतीने डेकोरेटर्स मंडळींच्या अंगावर काटा उभा राहीला आहे.
२१ सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवास सुरूवात होत आहे. न्यायालयीन आदेशानुसार रस्त्यावर गरबा तसेच दांडिया खेळण्यास मनाई असली तरी राजकीय घटकांनी जनसंपर्काची ही अनोखी संधी साधण्याकरिता विभागातील क्रिडांगणाचा आधार घेतला आहे. क्रिडांगणावर ठिकठिकाणी राजकारण्यांच्या पुढाकाराने आयोजित नवरात्र उत्सवाचे मंडप लागलेले पहावयास मिळत आहे.
नवरात्र उत्सव आता अवघ्या २ दिवसावर आलेला असतानाच वरूण राजाने लावलेल्या हजेरीमुळे राजकीय घटकही चिंतातूर झालेले आहेत. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून गरबा, दांडिया आयोजनातून युवा मतदारांशी संपर्क साधणे सोयीचे जात असल्याने विकासकामांकडे कानाडोळा करणारे लोकप्रतिनिधीही नवरात्र उत्सवाच्या आयोजनात पैसा खर्च करण्यात हात आखडता घेत नसल्याचे नवी मुंबईत ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. पाऊस कायम राहील्यास मैदानावरील गाळ आणि चिखलामुळे युवा पिढी गरबा तसेच दांडिया खेळण्यास फिरकणार नसल्याची भीती नवरात्र उत्सव आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊसामुळे कामगार बसून राहील्याने कामगारांची मजुरी अंगावर येण्याची भीती डेकोरेटर्स मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. तयारीचा अंतिम हात फिरविण्यात डेकोरेटर्स मंडळी व्यस्त असतानाच पाऊसाच्या हजेरीमुळे त्यांच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. मजुराना सध्या ५०० ते ७०० रूपये मजुरी द्यावी लागत असून रात्रीच्या हजेरीला आणखी पैसे वाढवून द्यावे लागत आहेत. पाऊसाने मैदानावरील चिखल, गाळ यामुळे यंदा गरबा, दांडिया खेळायला मिळणार की नाही याबाबत उलटसूलट सुर युवकांकडून आळविला जावू लागला आहे.