नवी मुंबई : मुंबईत शांततामय पध्दतीने काढण्यात आलेल्या विशालकाय मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांविषयी अध्यादेश मुंबई मोर्चाला एक महिना उलटून गेला तरी सरकारने काढलेला नाही. सरकारच्या या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ ‘सकल मराठा समाज, नवी मुंबई’ जिल्ह्याच्या वतीने शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने पोलीस प्रशासनाकरवी दबाव आणत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आणि आंदोलनाचा फलक जप्त करून आंदोलन दडपून टाकण्याचा यावेळी प्रयत्न केला. अनिल सुबराव गायकवाड, अमित भरत ढोमसे, तुकाराम गोरक्षनाथ सूर्यवंशी, गणेश विश्वास साळुंखे, विठ्ठल बबन बांगर, ऍड. सिद्धेश विठ्ठल पाटील, हनुमंत आप्पासो ढोले, मयूर उत्तम धुमाळ, विजय नंदकुमार खोपडे, रोहित अमृत घाडगे, विनोद लक्ष्मण पोखरकर या आंदोलनकर्त्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, मराठा समाजाच्या मान्य झालेल्या मागण्यांचा अध्यादेश (जीआर) लवकरात लवकर काढावा अशा मागण्या करत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन शिवाजी महाराज चौक, वाशी परिसर दणाणून सोडला.