नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा विहित वेळेत उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने महानगरपालिकेच्या आवश्यक पदांना मंजूरी मिळण्याकरिता शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेमार्फत या पदांची गरज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (नवि-2) श्रीम. मनिषा म्हैसकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात येत होती. त्यांनीही या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत अनेक बैठका घेतल्या आणि 21 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये विविध संवर्गातील 656 पदांना मंजूरी देण्यात आली. त्यानुसार पुर्वीची मंजूरी मिळालेली 3279 पदे व ऑगस्ट महिन्यात मंजूरी मिळालेली नवीन 656 पदे अशा एकूण 3935 पदांचा विभागनिहाय आकृतीबंध मंजूर करण्यात आला.
यामध्ये आरोग्य सेवेची अत्यावश्यकता लक्षात घेऊन तसेच शहराच्या सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन शासनाने प्राधान्याने आरोग्य आणि अग्निशमन या दोन महत्वाच्या विभागांच्या सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम 2017 ला मान्यता देऊन आज 22 सप्टेंबर2017 रोजी तशा प्रकारचा आरोग्य विभागाकरीता शासन निर्णय क्र. नमुंम-1217/प्रक्र.179/17/नवि-2
शहराचे वाढते आधुनिकीकरण व नागरीकरण या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विशेष लक्ष दिले आहे. याकरिता आवश्यक अधिकारी-कर्मचारी यांची कमतरता दूर व्हावी यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अनुसरून आरोग्य सेवेतील 93विविध संवर्गांच्या सेवा प्रवेश नियमांना शासन मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेकरीता आवश्यक मनुष्यबळ लवकरच उपलब्ध होऊन नवीन रूग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणामुळे येथील नागरीकरणाचा वेग जास्त आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून अग्निशमन विभागाच्या बळकटीकरण, विस्तारीकरण व आधुनिकीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने आरोग्य विभागाप्रमाणेच अग्निशमन विभागाच्या आकृतीबंधास मान्यता दिल्यानंतर आता सेवा प्रवेश नियमांना मान्यता देण्यास प्राधान्य दिले. त्यास अनुसरून अग्निशमन विभागातील 15 विविध संवर्गांच्या सेवा प्रवेश नियमांना मान्यता प्राप्त झाली आहे.
यामुळे प्रत्येक संवर्गातील नेमणुकीच्या पध्दती, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, भरतीचे प्रमाण, शारीरिक क्षमता, विशेष नैपुण्य, वेतन व भत्ते, पदोन्नतीचे प्रमाण, विभागीय परीक्षा अशा विविध बाबींमध्ये स्पष्टता आलेली आहे. यामुळे भरतीची प्रक्रिया पार पाडणे सुलभ झाले असून सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ होणार आहे तसेच नवीन भरती प्रक्रिया पार पाडणे शक्य होणार आहे.
महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. रामास्वामी एन. यांनी स्विकारल्यानंतर विविध विभागांचा कार्य आढावा घेत असताना त्यांना महानगरपालिकेतील अपु-या कर्मचारीवृंदामुळे येणा-या अडचणी व त्याचा दैनंदिन कामकाजावर होणारा परिणाम लक्षात येत होता. त्यामुळे त्यांनी शासन स्तरावर मंजूरी प्रक्रियेत असणा-या उर्वरित पदनिर्मितीच्या व आकृतीबंधाच्या मंजूरीकडे विशेष लक्ष दिले व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास अनुसरून शासनाच्या नगरविकास विभागामार्फत ऑगस्ट महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेत विविध संवर्गातील नवीन 656 पदांना मंजूरी व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली होती. आता या 22 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार आरोग्य व अग्निशमन विभागाच्या सेवा प्रवेश नियमास प्राधान्याने मंजूरी देण्यात आली असल्याने नागरिकांसाठी महत्वाच्या आरोग्य व अग्निशमन या दोन्ही सेवांचे सक्षमीकरण होणार आहे.