नवी मुंबई : स्वच्छता ही मोहीमेपुरती मर्यादीत न राहता ती प्रत्येकाची नेहमीची सवय व्हावी हे आपले ध्येय असून आज देशातील आठव्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान असला तरी संपूर्ण लोकसहभागातून तो पहिल्या क्रमांकावर नेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वत:ची मानली पाहीजे असे सांगत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी एकदा आपल्याला स्वच्छतेची सवय लागली की वेगळे अभियान राबविण्याची गरजच राहणार नाही, मग आपली स्पर्धा आपल्याशीच असेल आणि आपण क्रमांकासाठी नाही तर स्वत:च्या समाधानासाठी कायमच स्वच्छता राखू असा विश्वास व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त 15 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेअंतर्गत संपूर्ण नवी मुंबई शहरात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून 24 सप्टेंबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रात ‘समग्र स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. या मोहीमेअंतर्गत आंबेडकरनगर, राबाडे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रांगणात महापौर महोदय आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांचेसमवेत उपमहापौर श्री.अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, नवी मुंबई स्वच्छता मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर संगीतकार गायक श्री. शंकर महादेवन, स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेविका श्रीम. रंजना सोनवणे, अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण व श्री.रमेश चव्हाण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपआयुक्त श्री.तुषार पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे, सहा. संचालक नगररचना श्री. ओवेस मोमीन, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, अभियानाच्या ब्रँड ॲम्बेसेडर आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वच्छताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याप्रसंगी बोलताना प्रत्येक नागरिकाने मी कचरा करणार नाही आणि केलेला कमीत कमी कचरा ओला व सुका असा वर्गीकरण करून ठेवेन व कचरागाड्यांमध्ये वेगवेगळा देईन असा निश्चय करायला हवा असे सांगत सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास काहीच अशक्य नाही, तसेच स्वच्छता ही आपल्या आरोग्यसाठी अतिशय महत्वाची गोष्ट असल्याने त्याकडे प्रत्येकाने गांभिर्याने लक्ष द्यावे व स्वच्छता मोहीमेत आपला जास्तीत जास्त सहभाग द्यावा असे आवाहन केले.
नवी मुंबई स्वच्छता मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन यांनी नवी मुंबईचा नागरिक असण्याचा मला अभिमान वाटतो असे सांगत वैयक्तिक स्वच्छतेप्रमाणेच शहराची सार्वजनिक स्वच्छता जपणे ही जबाबदारी मानतो असे मत व्यक्त केले. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने ओला-सुका कचरा वेगवेगळा करावाच, शिवाय पर्यावरणाला हानी पोहचविणा-या प्लास्टिकचाही वापर बंद करावा असे आवाहन केले. प्रसन्न या विद्यार्थ्याने अतिशय आत्मविश्वासाने स्वच्छतेविषयी प्रबोधन करणारे विचार मांडले, त्याला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुलांनी प्रतिसाद दिला, तो बघितला की आपले भविष्य सुरक्षित आहे अशी खात्री वाटते असे ते म्हणाले.
‘चला बनवूया आज टकाटक नवी मुंबई’ ही शंकर महादेवन यांनी नवी मुंबई स्वच्छता अभियानासाठी स्वरबध्द केलेली जिंगल गाताना त्यांच्यासोबत उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी ताल धरला. त्यावर आज स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत जातोय, त्यांच्या माध्यमातून हा संदेश घराघरात जाईल आणि स्वच्छता ही आपली गरज आहे असे प्रत्येकाला वाटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्यालयातील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. प्रसन्न खांबे याने स्वच्छतेविषयी उत्स्फुर्तपणे केलेल्या भाषणाला मान्यवरांसह सर्वांनीच कौतुकाची दाद दिली. त्याच्यासह सर्वांनी स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक, नागरिक यांचे सात विविध गट करून राबाडे परिसरात विविध वसाहतींमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अशाच प्रकारच्या दिघा ते बेलापूर अशा आठही विभागांत विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमांपैकी हनुमाननगर महापे शाळा, मिनी सी शोअर, वाशी, तुर्भे स्टोअर शाळा, शिवाजीनगर एम.आय.डी. सी. परिसरातील स्वच्छता मोहीमांच्या ठिकाणी मान्यवरांनी भेटी देऊन स्वच्छतेचा संदेश प्रसारीत केला. तुर्भे स्टोअर शाळेतील कार्यक्रमात प्रारंभ संस्थेने स्वच्छताविषयक पथनाट्य सादर केले. तसेच महापे येथील कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छतेचा व कचरा वर्गीकरणाचा संदेश विभागाविभागात जाऊन प्रसारीत करणा-या स्वच्छता माहिती व प्रसार वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी मान्यवरांसोबत परिवहन समिती सभापती श्री. प्रदीप गवस, ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. रूपाली किस्मत भगत, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. संगीता बो-हाडे, आरोग्य समिती सभापती श्रीम. उषा भोईर, नगरसेवक सर्वश्री सुरेश कुलकर्णी, रविंद्र इथापे, रमेश डोळे, लिलाधर नाईक, राजेश शिंदे, नगरसेविका श्रीम. राधा कुलकर्णी, श्रीम. संगीता वास्के, श्रीम. मुद्रिका गवळी, श्रीम. कविता आगोंडे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार तसेच त्या त्या विभागातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील वर्षी स्वच्छता अभियानात देशभरातून 434 शहरे सहभागी होती, त्यामध्ये आपण आठव्या क्रमांकावर होतो. यावर्षी साधारणत: दहापट जास्त 4 हजाराहून अधिक शहरे सहभागी होत असून प्रत्येक नागरिकाचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे, त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता हे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून स्वच्छतेची सवय अंगिकाराली आणि स्वच्छता मोहीम ही एका केवळ दिवसापुरती मर्यादीत न ठेवता त्यामध्ये स्वत:सह आपले शेजारी, मित्रपरिवार यांनाही सहभागी करून घेतले व याला स्वच्छता चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले तर आपले नंबर वनचे ध्येय साध्य करता येईल असा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला व नागरिकांना स्वच्छता मोहीमेत सक्रीय सहभागाचे आवाहन केले.