मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना घडली घटना
निलेश मोरे
मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील उतेकर चाळ, महाड तालुका, गोळीबार रोड येथे राहणारे रवींद्र सकपाळ हे आपल्या सनी सकपाळ (वय ११) या मुलाचा घरी वाढदिवस साजरा करत असताना अचानक घराचा माळा खाली कोसळला. यामध्ये कोमल पोपट दळवी (१७) , आयान खान ( २ ) श्रावण मोरे (१३), पार्थ कात्रजे (९) वैशाली कात्रजे (३०) यशोदा ढाणे (४१), भीमा जाधव (४५), कीर्ती मांडके (९), सनी रवींद्र सपकाळ (९), सागर बेर्डे ( ७ ) हे जखमी झाले असून त्यांना जवळील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
सदर घटना शुक्रवारी (दि.२२ सप्टेंबरी) रात्री ९:४५ च्या दरम्यान घडली . घटनेचं वृत्त कळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रूग्णवाहिका दाखल झाले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. जखमीमध्ये पार्थ कात्रजेच्या (९) डोक्याला, पोटाला आणि पायाला जखम जास्त झाल्याने त्याला ओपीडी मध्ये नेण्यात आले आहे . मात्र सर्व जखमींची प्रकृती ठीक असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
दरम्यान यावेळी घराचे भाडोत्री रवींद्र सकपाळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, २२ सप्टेंबर रोजी माझ्या मुलाचा वाढदिवस होता . मी कामावरून घरी आल्यानंतर रात्री ९:४५ च्या दरम्यान आम्ही शेजारील व्यक्ती तसेच त्याच्या मित्राना या वाढदिवसासाठी घरी बोलावले होते . मी या घरात भाड्याने राहत असून दुसरा मजल्यावर राहतो. मजल्या खालील घर हे रिकामे असून त्यात कुणीही भाडोत्री राहत नाही. सदर घटना घडेल असे वाटले नाही. परंतु पोटमाळ्याच्या डागडुजीबाबत मी २ वर्ष घराचे मालक अरुण म्हासुरकर यांच्याशी बोललो होतो, मात्र त्यांनी तेवढे गांभीर्याने घेतले नाही. आणि आज वाढदिवस साजरा करत असताना माणसांच्या वजनामुळे ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. घर मालक अरुण म्हासुरकर हे घटना घडल्यापासून त्यांचा संपर्क होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.