निलेश मोरे
मुंबई : पेट्रोल आणि डिझेल तसेच घरगुती वापरण्यात येणार्या वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत . त्याची झळ सामान्यांवर बसत आहे . भाजपा सरकार सत्तेत येऊनही महागाई कमी होत नाही . सामान्यांच्या हितासाठी सेना भाजपा सोबत सत्तेत राहिली मात्र महागाई कमी व्हावी असे भाजपा सरकारला वाटत नसल्याने शिवसेना अशा थापाड भाजपा सरकारच्या विरोधात आता रस्त्यावर उतरली आहे .
जनतेला महागाईच्या गर्तेत लोटणार्या मोदी, फडणवीस सरकारच्या विरोधात शनिवारी (दि. २३ सप्टेंबर) मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेने महामोर्चा काढला . घाटकोपरमध्ये शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात भस्मासुराचा राक्षस आणि देवी वेशभूषेत व्यक्ती स्वरूपात सहभागी करण्यात आले होते . महिलांनी चूल मांडून तव्यावर भाकरी शेकवून महागाईची गृहिणींना कशी झळ बसते याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले. यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात सेनेने घोषणाबाजी केली . या मोर्चात सेनेचे उपविभाग प्रमुख सुभाष पवार, विधानसभा संघटक संजय दरेकर , माजी नगरसेवक दीपक हांडे , नगरसेविका अश्विनी हांडे , सहकार सेनेचे संदीप तांबे , अशोक वंडेकर , शाखाप्रमुख संजय कदम , अवि राऊत , युवा सेनेचे अजय भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता . मोर्चा चिघळू नये यासाठी घाटकोपर चिराग नगर पोलिसांनी आधीच कडक बंदोबस्त ठेवला होता . यावेळी विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले कि महागाईमुळे सामान्य जनतेमध्ये खूपच असंतोष निर्माण झाला आहे . सामान्यांच्या हितासाठी सेना सत्तेत राहिली मात्र भाजपा सरकार सामान्यांना अजूनही थापाच देत आहे . भाजपा सरकार सामान्यांचं हित पाहणार असेल तरच आम्ही सत्तेत राहू अन्यथा सेनाप्रमुख उद्धव ठाकरे केव्हाही सत्तेतुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतील मग यापुढे आंदोलनातून शिवसेना भाजपा सरकारला कसे प्रत्युत्तर करते हे त्यांना कळेल अशा शब्दांत राजेंद्र राऊत यांनी मोर्चा दरम्यान प्रतिक्रिया दिली .