निलेश मोरे
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपर्यात सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ या संकल्पनेतून सुरु केलेल्या या मोहिमेत लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग ही दिसून येत आहे . स्वच्छ भारत मिशनच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती या कालावधीत स्वच्छता हीच सेवा अंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून उद्याने, मैदाने, स्मारके, रस्ते या ठिकाणी होत असणारी स्वच्छता कॉर्पोरेटसारख्या क्षेत्रातही होत आहे. मुंबईचे विधान परिषदेचे आमदार आर.एन.सिंह यांच्या नेतृत्वाखाली हिरानंदानी येथील कॉर्पोरेट क्षेत्र असणार्या विभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मुंबईत डेंग्यू , मलेरिया या रोगाचे प्रमाण कॉर्पोरेट सारख्या क्षेत्रात ही वाढत आहे. बहुतांशी या क्षेत्रातील परिसर स्वच्छ दिसत असले तरी कॉर्पोरेट इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, झाडांच्या, फुलांच्या कुंड्या अशा ठिकाणी डेंग्यू वा मलेरियासारख्या आजारांची उत्पत्ती होते. यामुळे स्वच्छ आदत, स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत आमदार आर.एन.सिंग यांनी स्वच्छतेचा जागर कॉर्पोरेट क्षेत्रापासून सुरु केला. या मोहिमेत या क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग दाखवला. या कार्यक्रमाला महिला सक्षमीकरणाच्या सल्लागार गीता सिंह, कृष्णकांत मिश्रा, अमरजीत सिंग, संजू सिंग आदी या मोहिमेत सहभागी होते.