पनवेल : सिडकोच्या विविध नोड मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्यांविषयी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष बी. के. राजे यांनी संघटनेच्या व सफाई सफाई कामगारांच्या प्रतिनिधींसोबत आज आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच मी सोबत असून लवकरच याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी यांची भेट घेऊन या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली जाईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी आश्वासन दिले.
सिडको घनकचरा व्यवस्थापनाची सेवा १ ऑक्टोबर रोजी पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याच्या तयारीत आहे , परंतु पनवेल महानगरपालिका या सेवेत सिडको कडून अनेक त्रुटी होत असल्याने व पालिकेकडे पुरेसी क्षमता व मनुष्यबळ नसल्याने ही सेवा हस्तांतरित करण्यास इच्छुक नाही. सिडको आणि पनवेल महापालिका यांच्या हस्तांतरणाच्या या वादात सफाई कामगारांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता उद्भवली होती. यामुळे महाराष्ट्र कामगार संघटनेने ठाणे औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार करून सिडको आणि संबधितांना सफाई कामगारांच्या सेवा हस्तांतरणास स्थगिती दिली आहे. सफाई कामगारांच्या हस्तांतरणास न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, या कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. याबाबत आपण लवकरात लवकर सिडकोचे एमडी भूषण गगराणी यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.