नांदेड : कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आ.सुजीतसिंह ठाकूर यांचे नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळे भाजपाने नांदेड महापालिका प्रचाराच्या पहिल्याटप्प्यात चांगलाच जोर मारलेला असतानाच आता विजयादशमीचा मुहूर्त साधत भाजप शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराला धडाक्यात सुरूवात करणार आहे. काळेश्वर मंदीरात प्रचाराचा नारळ वाढवून या प्रचाराची सुरूवात होत आहे. यावेळी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. सुजीतसिंग ठाकूर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अन्य पक्षांचा प्रचार रडत खडत सुरू असतानाच भाजपच्या प्रचाराची मात्र चांगलीच धूम आहे. त्यातच आता विजयादशमीचा मुहूर्त साधत ३० सप्टेंबर रोजी काळेश्वर मंदीर येथे सकाळी १० वाजता होणार्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात पक्षाचे सर्वच्या सर्व म्हणजे ८१ उमदेवार उपस्थित राहणार आहेत. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर गुरूद्वारा, गायत्री मंदीर व गाडीपुरा येथील हनुमान मंदीरात दर्शन घेवून उपस्थितांना मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. हा सोहळा ’न भुतो, न भविष्यती’ करण्याच्या दृष्टीने स्थानिक स्तरावर जय्यत तयारीही सुरू आहे.
गेल्या काही काळात झालेल्या राज्यभरातील बहुतांश महानगरपालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून नांदेडमध्येही त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. तर केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या तीन साडेतीन वर्षात केलेल्या विकासकामांच्या बळावर या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास आ. सुजीतसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मतदारांकडूनही प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तेम्हणाले. जवळपास सर्व प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाल्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या सभा शहरात होणार असल्यामुळे जनतेत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
——————————–
उमेदवारांच्या मदतीला ग्रामीण कार्यकर्ते सरसावले
ना. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या उमदेवारांच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्याजोडीला ग्रामीण भागातून आलेल्या या कार्यकर्त्यांमुळे भाजप उमदेवारांतही आनंदाचे वातावरण पसरले आहे.
—————————————————–
बंडखोरांना बळ देण्याची विरोधकांची रणनिती फसली
पक्षातील नाराज उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे होणारे मतांचे विभाजन टळणार आहे. परिणामी त्याचा लाभ पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मिळणार असून बंडखोरांना चेतवण्याचा विरोधकांचा डाव फसला आहे.