नवी मुंबई : फिफा वर्ल्डकप 17 वर्षाखालील स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई क्षेत्रात करण्यात आलेले आहे. नवी मुंबई हे यजमान शहर (Host City) असल्याने नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीची रुजवात होण्यासाठी प्रत्येक शाळेला पाच फुटबॉल याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 70 शाळांना 350 फुटबॉलचे तसेच फुटबॉलमध्ये हवा भरण्याच्या पंपाचे वितरण करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आंबेडकर नगर राबाडे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदयालय शाळा क्र. 55 व 104 मध्ये नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते फुटबॉल वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. रमेश चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक डॉ. सुहास शिंदे व शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे उपस्थित होते.
महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे फुटबॉल वितरण करण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. महापौर यांनी आपल्या भाषणात विदयार्थ्यांना मैदानी खेळांचे महत्व समजावून सांगितले. याप्रसंगी महापौर यांनी फुटबॉलला किक मारुन विदयार्थ्यांच्या सामन्याचा शुभारंभ केला. महापालिका क्षेत्रात जागतिक फुटबॉल स्पर्धा होत असल्याने फुटबॉल फिव्हर सगळीकडे दिसत असून खेळाच्या माध्यमातून आरोग्य जपणूकीचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित केला जात आहे.