स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये शनिवारी सकाळी सिताफळाची आवक वाढल्याने सिताफळाच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून फळ मार्केटमध्ये सिताफळाची वाढती आवक आणि घसरत चाललेले बाजारभाव या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत सिताफळ उत्पादक शेतकर्यांचे दिवाळे निघण्याची भीती बाजार आवारात व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सकाळी फळ बाजारात ४० हजाराहून अधिक कॅरेटमधून सिताफळाची आवक झाली असल्याची माहिती फळ मार्केटमधील अभ्यासू व्यापारी शिवाजीराव सिताराम महाडीक यांनी दिली. कॅरेटमध्ये १२ ते २० किलो वजनाची सिताफळे असतात. महाराष्ट्रातील पुणे, सासवड, बारामती, सोलापुर, बीड, जालना, पंढरपुर, नगर, शिरूर, नाशिक, जुन्नर भागातून सध्या मार्केटमध्ये सिताफळ विक्रीला येत आहेत. सध्या मार्केटमध्ये आवक वाढल्याने बाजारभाव गडगडले असले तरी ग्राहक फिरकत नसल्याने व्यापार्यांना ग्राहकाची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्युस बनविणार्या खरेदीदारांना सिताफळ खरेदीसाठी साकडे घालावे लागत असल्याची माहिती फळ व्यापारी शिवाजीराव महाडीक यांनी दिली.
१० रूपयापासून ७० रूपये किलो या दराने सिताफळ विकली जात आहे. अचानक वाढलेल्या आवकमुळे सिताफळाचे घसरत चाललेले भाव यामुळे सिताफळ उत्पादक शेतकर्यांचे ऐन दिवाळीतच दिवाळे निघालेले फळ मार्केटमधील सिताफळाच्या उलाढालीवरून पहावयास मिळत आहे.