स्वयंम न्युज ब्युरो : 8082097775
नवी मुंबई : भरधाव वेगात जाणार्या मारूती गाडीने समोर असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर काही क्षणातच मारूती गाडीने पेट घेतला. या घटनेत मारूती गाडी अवघ्या काही मिनिटातच जळून भस्मसात झाली आहे. या दुर्घटनेत गाडीत बसलेल्या तीन जणांचे भ्रमणध्वनी, वाहन चालविण्याचे परवाने जळाले असून रस्त्याच्या मध्यभागी असणार्या पथदिव्यांची (स्ट्रीट लाईट) केबल्स पूर्णपणे जळाली आहे.
नेरूळ सेक्टर ५ येथे डीवायपाटील रूग्णालयापासून पुढे गेल्यावर एसबीओ स्कूलजवळ ही घटना घडली. गाडी पेटताच गाडीतील तीन जणांनी तात्काळ रस्त्यावर धाव घेतल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. गाडी जळताच काही मिनिटातच नेरूळ पोलिस आणि अग्निशमनची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अवघ्या १० मिनिटातच आगीवर नियत्रंण मिळविण्यात अग्निशमनला यश आले असले तरी गाडी मात्र पूर्णपणे जळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
टोईग गाडी आणून जळीत गाडी रस्त्यावरून दूर हटविण्यात आली असून या ठिकाणी घटनास्थळी असणारे नेरूळमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी धावपळ केली. बघ्यांची गर्दी हटविताना त्यांनी वाहतुक कोंडी होवू नये म्हणून वाहनचालकांना मार्गदर्शन केले. पथदिव्याची केबल्स जळाल्याचे रतन मांडवे यांनी नेरूळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देताना तात्काळ पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाला संपर्क साधला. पथदिवे सुरू झाल्यावर जळीत केबल्समुळे होणारी संभाव्य दुर्घटना रतन मांडवे यांच्या तत्परतेने टळल्याचे माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.