पनवेलमध्ये पार पडली बैठक, लवकरच संघटना बांधणीला प्रारंभ
पनवेल/प्रतिनिधी
गुजरातच्या निवडणुकीमुळे तिथे दांडी यात्रेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात देशभर कॉंग्रेसला पोषक वातावरण राहील, असे मत व्यक्त करून पनवेल कॉंग्रेसची मोट पुन्हा बांधण्यासाठी आज, ज्येष्ठांची विचार विनिमय बैठक संपन्न झाली. तळागाळातील कॉँग्रेसजनांना एकत्र आणण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
जिल्हा कॉँग्रेस विचार सेलचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या पनवेल येथील निवासस्थानी ही बैठक रमणिकशेठ माखेजा आणि ऍड. गजानन पाटील यांनी आयोजित केली होती. त्यावेळी पक्ष संघटनेला नवे रूप देण्यावर एकमत झाले.
बैठकीला माजी उपनगराध्यक्ष रमणिकशेठ माखेजा, माजी तालुकाध्यक्ष अँड. गजानन पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. भक्तीकुमार दवे, माजी नगराध्यक्ष मोतीलालशेठ बांठीया व सईद मुल्ला, माजी नगरसेवक आबा खेर, जिल्हा चिटणीस शशिकांत बांदोडकर, ज्येष्ठ नेते अखिल अधिकारी, सैफुद्दीन बोरा, कॉँग्रेस विचार सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल कडू, नवीन पनवेल विभागीय अध्यक्ष सुधीर मोरे, अशोक बहिरा आदी मोजकीच मंडळी उपस्थित होती.
कॉँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे, ती कधी संपुष्टात येणारी नाही. समाजधारेच्या अनुषंगाने जात असताना राजकीय पक्षांची पडझड होत असते, ती अनेकदा कॉँग्रेसची झाली. आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असा संदेश घेवून गावोगावी जावून पक्ष संघटना लवकरच नव्याने उभी करू या, असे मत उपस्थितांनी मांडले.
पूर्वीचा काळ पक्षाच्या विचारधारेने भारावलेला होता. तो काळ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंत चव्हाण यांचा होता, कुशल संघटक आणि कार्यकर्त्यांची अचूक नाळ जाणणार्या वसंतदादांचा होता, बॅ. अंतुले, मोपलवार आणि इंदिरा, राजीव गांधींचा होता. आजही पक्षात तीच शिस्त आहे. सोनिया आणि राहुल गांधी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कार्यकर्त्यांचा तोच विश्वास आहे. स्थानिक पातळीवर काही वैचारिक मतभेद असू शकतात परंतु, कॉँग्रेस अभेद्य ठेवण्यासाठी ते मतभेद बाजूला सारून नजिकच्या काळात सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे यशस्वी पर्यंत करू, या असा मतप्रवाह व्यक्त करण्यात आला.
आबा खेर आणि शशिकांत बांदोडकर यांच्यावर जुन्या आणि निष्ठावंत कॉँग्रेसजनांची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच येत्या पंधरा दिवसात दूसरी बैठक आणि संघटना बांधण्यासाठी दिशा ठरविण्यात येईल, असे ठरले. त्यानुसार पक्ष बांधणीच्या दिशेने पहिले पाऊल आजच टाकण्यात आले.