लोकनेते गणेश नाईक यांचे मार्गदर्शन
नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज शनिवार दिनांक ९ डिसेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात दुपारी २.३० वाजता होणार असून लोकनेते गणेश नाईक यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात कार्यकर्त्यांना लाभणार आहे, अशी माहिती मेळाव्याचे निमंत्रक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दिली आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने लोकनेते नाईक यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उत्सुक असून अशा मेळाव्यांमधून लोकनेते नाईक पुढील वाटचालीची दिशा देत असतात. लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. शहर विकासाची बांधिलकी, शहर संस्कृतीचे जतन, जनतेच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांचे कर्तव्य, पक्ष संघटना आदी विषयांवर लोकनेते नाईक बोलतील, अशी अपेक्षा असून या मेळाव्यातून पुन्हा एकदा नव्या जोमाने कार्यरत राहण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळणार आहे.
या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी, तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीची नवी मुंबईत दमदार वाटचाल सुरु आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्भिड विचारांचे बाळकडू कार्यकर्त्यांना मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी लोकनेते गणेश नाईक मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुतार यांनी दिली आहे.