पनवेल: पनवेल शहरासह महापालिका परिक्षेत्रातील इतर शहरे आणि काही अंशी ग्रामीण भागातील अवैध गुटखा विक्रीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, काही ठिकाणी चोरीछुपके विक्री सुरूच आहे. राज्य शासनाने सन 2012 मध्ये गुटखा विक्रीला बंधन घातले आहे. त्यानंतर दरवर्षी बंदीचा निर्णय पुढे एका वर्षासाठीच्या कालावधीकरिता शासन वाढवत आहे. रायगड जिल्ह्यात कॅन्सरसारख्या भयानक रोगाचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आल्याने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सामाजिक स्वास्थ्य टिकून रहावे, याकरिता गुटखा मुक्त पनवेल आणि रायगडचा ध्यास घेतला आहे. त्याकरिता त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आणि त्यातील काही लाभार्थी बेचैन झाले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे जॉइंट कमीशनर सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत संघर्षच्या मागणीने पनवेल येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बैठकीनंतर काल, सोमवारी (दि. 15) प्रशासनाची याविषयी ठाणे येथे बैठक झाली. दोन दिवसात प्रत्यक्ष कारवाईचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, संघर्षने हाती घेतलेल्या कामाची प्रचिती नागरिकांना यापूर्वीच विविध सामाजिक कामांतून आली असल्याने गुटखा विक्रेत्यांनी धसका घेतला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक पान टपरी, चहा टपरीवर बिनदिक्कितपणे सर्रास मिळणाऱ्या पुड्यांना आळा बसला आहे.
कॉलेजचा आवार, नाकानाक्यावर पुढीतून गुटखा विकण्याची क्लुप्ती विक्रेत्यांनी सुरू ठेवली आहे. यातून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे. तसेच पनवेल आणि परिसरात चार ते पाच मोठे वितरक आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साठा आहे. तो उद्ध्वस्त करण्यासाठी कालच रायगडचे अन्न व औषध प्रशासन निरीक्षक दिलीप संगत आणि कांतीलाल कडू यांच्यात चर्चा झाली आहे. ती मोहीम हाती घेतली आहे, असे संगत यांनी सांगितले आहे.