आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
नवी मुंबई :- गेली अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न व तेथील रहिवाशांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ या संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन प्रशासनाने सदर डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलविण्याकरिता कार्यवाही करण्याचे सूचित केले होते. महसूल व वनविभाग कडून सदर डम्पिंग ग्राउंड करिता मौजे तुर्भे, ता.जि.ठाणे येथील गट नं. 376 मधील 18एकर क्षेत्र, गट नं.377 मधील 3.75 एकर क्षेत्र, गट नं. 378मधील 12.25 एकर क्षेत्र अशा एकूण 34 एकर क्षेत्राचा नवी मुंबई महानगरपालिकेस ताबा देण्याची शासन मान्यता देण्यात आली होती. परंतु त्याकरिता सदर जागेची रक्कम रुपये 192 कोटी नवी मुंबई महानगरपालिकेस भरणा करावयास सांगण्यात आली होती. याच अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात बैठक होऊन 192 कोटी रुपयांच्या भरणापैकी रु. 92 कोटी माफ करण्यात येऊन नवी मुंबई महानगरपालिकेने रु. 100 कोटी चा भरणा टप्याटप्याने 10 हाफत्यात भरणा करण्याचा निर्णय झाला. यावेळी न.मुं.म.पा. आयुक्त डॉ. रामस्वामी एन. हेही उपस्थित होते.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सदर डम्पिंग ग्राउंड करिता आपल्या महसूल विभागाने 34 एकर जागेचा ताबा नवी मुंबई महापालिकेस देण्यात आला आहे. परंतु त्याकरिता सुमारे 192 कोटी रुपयांचा भरणा करावयास सांगण्यात आला आहे. काल दि. 16.01.2017 रोजी मा. महसूल मंत्री महोदयांच्या दालनात बैठक होऊन सदर जागेची भरणा करण्यास सांगितलेली रक्कम रु. 100 कोटी 10 हाफत्यामध्ये भरावयास सांगण्यात येऊन सदरबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही मान्यता दिली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले…
सदर विषय लवकरात लवकर मार्गी लागण्याकरिता महानगरपालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनीही महत्वाचा पुढाकार घेतला असून तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनीही अनेक वेळा सदर प्रश्नाबाबत आवाज उठविला आहे. तुर्भे डम्पिंग ग्राऊंडसाठी 34 एकर जागा नवी मुंबई महानगरपालिकेची होणार असून सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे तुर्भे वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.