मुंबई : 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संविधान बचाओ रॅली काढणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, देशातले आणि राज्यातले सत्ताधारी संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असून याविरोधात २६ जानेवारीला सर्वपक्षीय बचाओ रॅली निघणार असून काँग्रेस पक्ष या रॅलीत सहभागी होणार असून त्याच दिवशी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संविधान बचाओ रॅली काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय संविधान बचाओ रॅलीला उत्तर म्हणून भाजप तिरंगा रॅली काढणार आहे. भाजपाची पितृ संस्था असणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाचा राष्ट्रध्वज तीन रंगाचा असणे अशुभ असे सांगून राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याचा अवमान केला. संघमुख्यालयात अनेक वर्ष तिरंगा फडकावला ही नाही. तेच लोक तिरंगा रॅली काढतायेत हे हास्यापद आहे असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेस पक्ष सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार आहे त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. सातारा येथील भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, बंटी पाटील, दिलीप देशमुख, बस्वराज पाटील, मधुकरराव चव्हाण, विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, खा. हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा उपस्थित होते.