सुजित शिंदे
नवी मुंबई :- नवी मुंबई शहरामध्ये भटक्या व मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या शहरवासियांकरिता त्रासदायक बाब ठरली आहे. जुईनगर सेक्टर २४ मध्ये मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने पाच मुलांसह गायीचा चावा घेण्याची घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे कुत्रा चावल्यावर घ्यावी लागणारी ऍण्टी रॅबिजची इंजेक्शनही उपचाराकरिता उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली. चावा घेतलेल्या बालकांच्या पालकांना उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या सायन आणि नायर रूग्णालयात धाव घ्यावी लागली.
जुईनगर सेक्टर २४ परिसरात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपाशेजारील रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्याचा उद्रेक जुईनगरवासियांना जवळून पहावयास मिळाला. पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतलेल्या बालकांपैकी रोशन सुरेश ठाकूर या पाच वर्षीय मुलाच्या तोंडाचा चावा घेवून लचके तोडले. या मुलासोबत असलेल्या पारस सुरज विश्वकर्मा या नऊ वर्षीय मुलालाही या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत अन्य तीन मुलांचा चावा घेतला. यासह रस्त्यावर असलेल्या एका गायीलाही हे पिसाळलेले कुत्र्याने चावा घेतला. चावा घेतलेल्या मुलांना घेवून पालक नेरूळमधील माता बाल रूग्णालयात गेले असता त्यांनी पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात उपचारासाठी घेवून जाण्यास सांगितले. वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात गेल्यावर त्या ठिकाणी इंजेक्शनच नसल्याचे दिसून आल्यावर पालकांना मुलांना घेवून मुंबई महापालिकेच्या सायन रूग्णालयात घेवून जाण्यास सांगितलेे. सायन रूग्णालयातही ही इंजेक्शन नसल्यावर त्यांना नायर रूग्णालयात जाण्यास सांगितले. चावा घेतलेल्या बालकांची होत असलेली ससेहोलपट पाहता एकाने जुईनगर येथील खासगी रूग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून परिस्थिती कथन केली. त्या डॉक्टरांनी आपल्या रूग्णालयात इंजेक्शन असल्याचे सांगताच त्या बालकांना पुन्हा जुईनगर येथे आणण्यात आले.
*****************
प्रतिक्रिया
नवी मुंबई महापालिकेला एकतर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नाही आणि कुत्र्यांनी चावा घेतल्यावर उपचारासाठी औषधेही ठेवता येत नाही. स्वमालकीचे मोरबे धरण असणार्या नवी मुंबई महापालिकेच्या ठेवी कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना त्यांना ऍण्टी रॅबिजची इंजेक्शन घेण्यास पैसे नाहीत काय? एकीकडे पालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ आणि दुसरीकडे कुत्र्यांनी चावा घेतल्यावर महापालिकेच्या नेरूळसह वाशीतल महापालिका रूग्णालयात औषधांचा अभाव हे चित्र नवी मुंबई महापालिकेला भूषणावह नाही. महापालिकेच्या ब प्रभाग समितीच्या बैठकीत याचा महापालिका प्रशासनाला नक्कीच जाब विचारला जाईल.
– मनोज यशवंत मेहेर
ब प्रभाग समिती सदस्य
नवी मुंबई महानगरपालिका