दिपक देशमुख
नवी मुंबई :- नवी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने देशामध्ये स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक यावा यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. रस्त्यांची दोन वेळा दिवसातून सफाई, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई अशा विविध योजना गतीमान झाल्या आहेत. सामाजिक संस्था, राजकीय पक्षसंघटना, नगरसेवक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते यासह नवी मुंबईकरही उत्स्फुर्तपणे अभियानात सहभागी झाले आहेत. मात्र शहरात असणारी एमएसईडीसीची सबस्टेशनचा बकालपणा या सर्वेक्षणात अडथळा ठरत असल्याने आता महापालिकेने विद्युत विभागाला रडारवर आणले आहे.
वीज विभागाची सबस्टेशन आजही मोठ्या प्रमाणावर बकाल आहेत. यामध्ये ठिकठिकाणी डेब्रिज व रॅबिट पडले आहे. जंगली गवत वाढले आहे. लोकांकडून लघुशंकेसाठी वापर होत आहे. एमएसईडीसीने लवकरात लवकर सबस्टेशनची सफाई करावी अथवा महापालिका ती सफाई करेल, त्याचा खर्च एमएसईडीसीने द्यावा अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणात एमएसईडीसीच्या सबस्टेशनच्या बकालपणाचा, अस्वच्छतेचा अडथळा येत असल्याने महापालिका प्रशासन ही बाब गंभीरपणे घेत असल्याचा इशारा महापालिका प्रशासनासह महापौरांनीही एमएसईडीसीलाट दिला आहे. एमएसईडीसीच्या अधिकार्यांची भेट घेवून त्यांना स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी आपणास विद्युत सबस्टेशन पहावयास मिळतात. या सबस्टेशनचा वापर वीज विभागाऐवजी अन्य कामासाठीच अधिक होत असलेला पहावयास मिळत आहे. वीज विभागाकडून आपल्या सबस्टेशन परिसराची कधीही स्वच्छता केली जात आहे. अनेक सबस्टेशनचे दरवाजे तुटलेले असून ये-जा करणारे त्या ठिकाणी लघुशंका करताना पहावयास मिळतात. अनेक सबस्टेशनच्या आवारात पावसात आलेले जंगली गवत पहावयास मिळत आहे.
याप्रकरणी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्याशी संपर्क साधला असता , एमएसईडीसीच्या सबस्टेशनच्या बकालपणामुळे व तेथील अन्य समस्यांमुळे स्वच्छता सर्वेक्षणामध्ये अडथळे येत असल्याचे मान्य केले. याबाबत महापालिकेने एमएसईडीसीशी संपर्क साधला असून स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशात प्रथम क्रमांक आणण्यासाठी महापालिका प्रशासन करत असल्याची त्यांना कल्पनाही दिली.याबाबत एमएसईडीसीने स्वत:च्या सबस्टेशनची स्वत:च स्वच्छता करावी अन्यथा महापालिका त्या परिसराची सफाई करेल व त्याचा खर्च महापालिका एमएसईडीसीकडून वसूल करणार असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले.