नवी मुंबई :- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सेक्टर 14, सी.बी.डी. बेलापूर मध्ये हॉटेल कृष्ण अवतार येथील पार्कींगच्या जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
सी.बी.डी. बेलापूर सेक्टर 14 येथील हॉटेल कृष्ण अवतार मधील पार्कींगच्या जागेचा अनधिकृतरित्या वापर केला जात होता. तसेच टेरेसवर देखील अनधिकृतरित्या हॉटेल व्यवसाय सुरु होता. त्याबाबत संबंधितांना एम.आर.टी.पी. कायद्यानुसार रितसर नोटीसही देण्यात आली होती. त्यामुळे आज बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी पथकाने व महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक यांच्या सहयोगाने 1 जेसीबी, 1 गॅस कटर, 14 मजूर यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या कारावाई मध्ये संबंधित हॉटेलधारकाकडून रक्कम रु. 40000/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.