अडीच लाखाचा माल केला हस्तगत
पनवेल :- गुटखा मुक्त पनवेल, गुटखा मुक्त रायगड संकल्पनेनुसार पनवेल संघर्ष समितीच्या मोहिमेला अन्न व औषध प्रशासनाने सहकार्य करत काल कामोठे येथील गुटखा दलालाच्या गोदामावर छापा टाकून अडीच लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीचा माल हस्तगत केला आहे. संघर्ष समितीने प्रशासनासोबत संपर्क ठेवून कारवाईचा धोशा लावल्याने गुटखा विक्रेत्यांचे कंबरडेच मोडण्याचा विडा अन्न व औषध प्रशासनाने उचलला आहे.
नववर्षाच्या प्रारंभीच पनवेल संघर्ष समितीने केलेल्या संकल्पानुसार कोकण विभागीय अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त सुरेश देशमुख यांच्यासह रायगड जिल्हा सहआयुक्त दिलीप संगत आणि विविध विभागाच्या अधिकार्यांची पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अवैध गुटखा विक्रीविरोधात कडक मोहिम हाती घेण्याचा निर्धार सर्वांनुमते घेण्यात आला होता. त्यानुसार पनवेलसह रायगडात मोठी मोहिम उघडण्यात आली आहे.
काल कामोठे येथील सेक्टर 10 मधील साई प्रतिमा हौसिंग सोसायटीमध्ये राहणारा ओंकार रामसंजीवन गुप्ता या एकविस वर्षीय गुटखा दलालाच्या राहत्या घरी छापा मारण्यात आला. त्यामध्ये विविध प्रकारचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला. त्याची बाजारभावाप्रमाणे 2 लाख 69 हजारापेक्षा जास्त किंमत असल्याची माहिती दिलीप संगत यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना फोनवरून दिली.
या मोहिमेत रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे आणि सुप्रिया जगताप यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी गुप्ता यांच्या घराला सील ठोकले आहे.
यासंदर्भात संगत यांच्या चमूचे संघर्षने कौैतुक केले असून येत्या पंधरवड्यात महत्वाची बैठक बोलाविण्यात येणार आहे. त्यातून अधिक तीव्रपणे ही मोहिम राबबविली जाईल, असे कांतीलाल कडू यांनी कळविले आहे.