रणवीर स्वित्झर्लंड टुरिझमचा ब्रँड अँम्बेसिडर असून, तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या देशात येऊन लग्न करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला आहे. आता हा प्रस्ताव रणवीर स्वीकारतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये दमदार चित्रपटांसोबतच रणवीर आणि दीपिकाचं लग्न हासुद्धा चर्चेचा विषय ठरणार आहे. या वर्षअखेर ते लग्न करणार असल्याचं कळत आहे. तेव्हा आता त्यांच्या लगीनघाईचा थाट नेमका असणार तरी कसा, हेच जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कुतूहल लागून राहिलं आहे.
रणवीर आणि दीपिका या दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु केली असून, भारताबाहेरच ते विवाहबद्ध होणार असल्याचं कळत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणेच रणवीर- दीपिकासुद्धा परदेशात लग्न करणार आहेत हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यांच्या लग्नासाठी आता विविध ठिकाणांची नावं समोर येत असून, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी ते स्वित्झर्लंडची निवड करु शकतात. कारण अनेकांच्याच विशलिस्टचा भाग असणाऱ्या या देशात लग्न करण्याचं बोलावणंच रणवीरपाशी चालत आलं आहे, असंच म्हणावं लागेल.
बॉलिवूडचं ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखली जाणारी जोडी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग येत्या काळात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. पण, त्यांनी कधीही माध्यमांसमोर आपल्या नात्याविषयी फार माहिती दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या चर्चा आणि कलाविश्वात वाहणारे लग्नसराईचे वारे पाहता बी टाऊनचे हे ‘राम-लीला’ही विवाहबंधनात अडकणार आहेत.