महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आयुक्तांना निर्देश
पनवेल :- पनवेल महापालिकेच्या महासभेत बोगस ठराव केल्याचे खोटे वृत्त छापून मनपाची बदनामी करणार्या वृत्तपत्रांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना दिले आहेत. तसे पत्र महापौरांनी बुधवारी (११ एप्रिल) आयुक्तांना दिले.
महापौर कविता चौतमोल यांनी आयुक्त सुधाकर शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेच्या महासभेत १५ ते १६ बोगस ठराव केले असल्याचे वृत्त ८ एप्रिल २०१८ च्या वर्तमानपत्रांमध्ये तुमच्या हवाल्याने छापून आले आहे, मात्र बोगस हा शब्दप्रयोग केला नसल्याचे आपण स्पष्ट केले. जर तुम्ही अशाप्रकारचे वक्तव्य केलेले नाही, तर मग संबंधित वृत्तपत्रांनी खोटी बातमी छापून तुमची, महापालिकेची आणि मनपाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या महासभेची बदनामी केलेली आहे. त्यामुळे या बाबींची गंभीर स्वरूपात दखल घेऊन संबंधित पत्रकारांकडून खोटी बातमी छापण्याबाबतचा खुलासा मागवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील दोन ते तीन दिवसांत कळवावा, असेही महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.