दीपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन परिसरात श्रमिक व कष्टकरी वर्गाची एलआयजी ही सिडकोची वसाहत असून या ठिकाणी धोकादायक विद्युत डीपी, उघड्यावरील वायरी यामुळे स्थानिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व स्थानिक रहीवाशी रवींद्र सावंत यांनी एमएसईडीसीचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. स्थानिक रहीवाशांचे शिष्टमंडळ या अभियंत्यांच्या कार्यालयात नेवून रवींद्र सावंत यांनी समस्येचे गांभीर्य संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
एलआयजीमधील आम्रपाली सोसायटीसमोरील विद्युत डीपी धोकादायक अवस्थेत आहे. डीपीतील वायरी उघड्यावर पडल्या आहेत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी पडलेली असल्यामुळे मुले या ठिकाणी खेळत असतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.
एलआयजी वसाहतीमध्ये सर्वच ठिकाणी विद्युत डीपी व उघड्यावरील वायरी हे चित्र स्थानिकांसाठी धोकादायक असल्याची भीती व्यक्त करत कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी विद्या भांडेकर यांनीही वीज अधिकार्यांना तात्काळ या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. शिष्टमंडळात सहभागी असलेल्या महिलांनी या समस्येचा पाढा वाचत अधिकार्यांच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून दिले. एमएसईडीसीच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी रवींद्र सावंत यांच्यासमवेत शिष्टमंडळामध्ये कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या विद्या अरुण भांडेकर, अश्विनी पंडित, सीमा वाघ, दीपाली सकपाळ, प्रियंका कासार, मीनल कांबळे, सुनीता क्षीरसागर, शबाना मुलांनी या आपल्या लहान मुलांसमवेत सेक्टर ५० नेरुळ सिवूड येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता गायकवाड यांना भेटण्यासाठी गेल्या. पण गायकवाड न भेटता अतिरिक्त कार्यकारी अधिकारी बिराजदार भेटले व त्यांना निवेदन दिले.