दीपक देशमुख
नवी मुंबई : मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात सर्वसामान्य साहित्य नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.मनपाच्या आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार थांबवा अशी मागणी रुग्ण करत आहेत.
मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात गरीब व गरजू रुग्ण नियमित उपचार घेत असतात.परंतु सध्या गेल्या आठ दिवसा पासून या रुग्णालयात हात मौजे व टाके टाकायचा धागाच संपल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी औषध दुकानातून आणावे लागत आहे.त्यामुले अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
खाजगी औषध दुकानातून हात मौजे विकत आणायचे म्हणजे 200 रुपये खर्च येतो तर टाके टाकायचा धागा विकत घ्यायचे असेल तर 400 रुपये खर्च येत असल्याने हा खर्च आर्थिक दुर्बल असणाऱ्या रुग्णांना परवडत नसल्याने त्यांच्यावर उपचार होत नसल्याचे वास्तव वाशी येथील रुग्णालयात घडत आहे.
काही दिवसा पूर्वी नवी मुंबई येथील एका वृत्तपत्राच्या संपादकाला चक्कर आल्याने ते कोसळले.त्यावेळी त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना 10 टाके पडले.त्यावेळी त्यांना 400 रुपये खर्च करून टाके टाकायचे धागा आणावा लागला.त्यामुळे या संपादकांनी आपल्या वृत्तपत्रातून मनपा वर प्रहार केला परंतु अजूनही त्याचा फायदा झाला नाही.
बुधवारी अशीच घटना एक 60 वर्षीय महिलेच्या बाबतीतही घडली.तिलाही जखम झाली होती.त्यावेळी सुद्धा हातमौजे नसल्याने तिलाही ताटकळत राहावे लागले.परंतु तिच्या कडे पैसेच नसल्यामुळे तिला त्याच अवस्थेत घरी जावे लागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.किमान आरोग्या सारख्या ठिकाणीही मनपाचे इतके दुर्लक्ष शोभत नसल्याचे संतापजनक प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत.
याबाबत वैद्यकीय अधिकारी दयानंद कटके यांना विचारले असता हातमौजे व टाके टाकण्याचा धाग्याचा पुरवठा झाला आहे असे सांगितले.जर संपला असेल तर चौकशी करतो असे सांगितले.