दीपक देशमुख
नवी मुंबई : सर्व देशामध्ये नवी मुंबई महापालिकेचा स्वच्छता सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक असावा म्हणून महापालिका आयुक्तांच्या आदेशाने स्वच्छता विभाग मागे लागला होता. महापालिका आयुक्तांनी कॉलनी परिसरात तर भुमीपुत्र असलेल्या महापौर जयवंत सुतारांनी गावठाण भागात दौरेही केले. पण आजही नवी मुंबईत पदपथावर कचराकुंड्या व विखुरलेला कचरा पाहता या स्वच्छता सर्वेक्षणाचे धिंडवडे निघाल्याचे नवी मुंबईत सर्वत्र पहावयास मिळत आहे.
घणसोली येथील वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये पदपथावर गेल्या दोन महिन्यापासून पडलेला कचरा उचलला जात नसल्याने नागरिकां मधून संताप व्यक्त केला जात आहे. हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन कदम व ऍड. स्वप्नील जगताप यांनी केली आहे.
घणसोली मधीक वॉर्ड क्रमांक ३५ मधील एफ टाइप घरोंदा सोसायटी व ए एस पी कॉन्व्हेंट शाळेसमोर मागील दोन महिन्यापासून झाडांच्या फांद्या व कचरा आहे. परंतु आजपर्यंत कोणीही हा कचरा उचलला गेला नाही. यामुळे पदपथावरून येणार्या व जाणार्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ही याचा त्रास होत असल्याचे रोहन कदम यांनी सांगितले. या ठिकाणी सकाळी सफाई करण्यासाठी कामगार येतात. परंतु तेदेखील कचरा उचलत नसल्याचे ऍड. स्वप्नील जगताप यांनी सांगितले. याबाबत स्वच्छता अधिकारी सतीश सनदी यांच्याशी संपर्क साधला असता लगेचच कामगार पाठवतोव कारवाई करतो असे सांगीतले.