दीपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात तुलनेने रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मनपाने निर्माण केलेले रिक्षा स्टॅण्ड कमी पडत असल्याने नवीन रिक्षा स्टँण्डची निर्मिती लवकरात लवकर करावी अशी मागणी ठाणे जिल्हा ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील रानकर यांनी केली आहे.
वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत रिक्षांची संख्या साधारणतः दहा हजार इतकी होती. परंतु सहा महिन्यानंतर परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने रिक्षा परवाना व बॅच असणार्या रिक्षा चालकाना सरसकट रिक्षा परमिट देण्याचे आदेश आल्याने त्यांची संख्या पाच हाजाराच्या घरात गेल्याने असलेल्या रिक्षा स्टँडवर भयानक गर्दी होत असल्याचे सुनील रानकर यांनी सांगितले.
रिक्षा स्टँडची संख्या कमी असल्यामुळे रिक्षा चालक व्यवसाय करण्यासाठी आपली रिक्षा कुठेही उभी करत असल्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नांबरोबरच अनेक वेळा भांडणासारखे प्रकार घडत असल्याचे ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राणकर यांचे म्हणणे आहे.
सध्या नवी मुंबई परिसरात पार्किंग समस्या मोठी आहे. रिक्षांचीही संख्या भरमसाठ मोठ्या प्रमाणात होत असल्यामूळे सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने रिक्षा स्टँडची गरज मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती माणुसकी युवा मंचचे अध्यक्ष सचिन शेलार यांनी दिली.
नवी मुंबई हे शहर नियोजनबद्ध शहर आहे. नोड सारख्या ठिकाणी सर्व नियोजन करून व्यवहार सुरू असताना रिक्षा स्टँड नसल्याने मनपाच्या सोंदर्याला बाधा पोहचत असल्याचेही सुनील राणकर यांनी सांगितले. याबाबत शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.