नवी मुंबई : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत एकूण ८० शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी बाबतचे प्रकरण मागील ६ वर्षापासून प्रलंबित होते. महापालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन. यांनी या बाबीकडे लक्ष दिले व शासनाकडून शिक्षकांच्या वेतनापोटी ५०% अनुदान प्राप्त होत असल्यामुळे शासन स्तरावरील गठित समितीमार्फत वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यातआला आणि त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील गठित समितीमार्फत सदर प्रस्तावास मान्यता घेण्यात आली. याव्दारे १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना रूपये ५२००-२०२००+२८०० (ग्रेडपे) या वेतनश्रेणीमधून ९३००-३४८००+४२०० (ग्रेड पे) ही वेतश्रेणी श्रेणी लागू करण्यात येत आहे. शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने होणार आहे. यामुळे शिक्षकांच्या मासिकवेतनामध्ये साधारणत: सरासरी रूपये ३८००/- वाढ होणार आहे. त्यानुसार वेतनवाढ फरकाची अंदाजित रक्कम रूपये १८० लक्ष शिक्षकांना लवकरच अदा करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने महापालिका सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आलेल्या १७ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या मंजूर ठराव क्र. २७६ अन्वये नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या पूर्वप्राथमिक वर्गातील ११६ बालवाडी शिक्षिकांच्या मानधनात मासिक रू. ८ हजारवरून रू. १५ हजार रूपये आणि १११ मदतनीसांच्या मानधनात मासिक रू. ५ हजार वरून १२ हजार रूपये तसेच माध्यमिक शाळांतील ३२ शिक्षकांच्या मानधनात मासिक रू. १३ हजार वरून रू. २५ हजार रूपये व ३१ शिक्षणसेवकांच्या मानधनात मासिक रू. ८ हजार वरून रू. २५ हजार रूपये अशी भरघोस वाढ करण्यात येत आहे.
ही वाढ जून २०१७ पासून लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार बालवाडी शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम रूपये ७०.०६ लक्ष, मदतनीसांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम रूपये ७१.६६लक्ष व माध्यमिक शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम रूपये ८८.६९ लक्ष अशी एकूण मानधनाच्या फरकाची रक्कम रूपये २३०.४२ लक्ष शिक्षकांना अदा करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याकडे विशेष लक्ष देत वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्यामुळे प्राथमिक शिक्षक तसेच मानधन वाढल्यामुळे माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांचेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.