सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी धरले धारेवर
स्वयंम न्युज ब्युरो :- 9619197444
पनवेल: ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्रवेश नाकारणाऱ्या केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य रंजन सिन्हा यांना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाने चांगलेच फैलावर घेतले. तेव्हा शाळा प्रशासनाची भंबेरी उडाली.
ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली शाळा प्रशासनाने दुकानदारी मांडली असून स्थानिक, प्रकल्पग्रस्तांच्या भिंगारी आणि काळूद्रे गावातील 24 विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपासून दूर ठेवले. इतकेच नाही तर सोडत काढताना ज्यांना प्रवेश द्यायचा होता फक्त त्याच विद्यार्थ्यांना बोलावून घेतले होते, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ आणि काही तरी काळंबेरं झाल्याचा आरोप करताच प्राचार्य रंजन सिन्हा यांना दरदरून घाम फुटला.
यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची लाच लुचपत खात्याकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात येईल, असे कडू यांनी सिन्हा यांना सांगितले. तर आपल्याला कोणतेच अधिकार नसल्याचे सांगत सिन्हा यांनी हात वर करताच त्यांना कायद्याने धारेवर धरताच ओएनजीसीचे भगवान दास यांच्याशी त्वरित संपर्क साधला. शाळेचे चेरमन वर्षातून एखादी बैठक घेतात असे सांगितल्याने यासंदर्भात तात्काळ चेरमनसोबत बैठक बोलविनण्याची मागणी केली. एक -दोन दिवसात ती बैठक घेतो असे भगवान दास यांनी कडू यांना सांगितले.
ज्येष्ठ नेते आर. डी. घरत यांनी शाळा प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास शाळेत एकही विद्यार्थी येवू देणार नाही. ओएनजीसी प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यास प्रवृत्त करू नका, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
प्राचार्य सिन्हा यांच्यासोबत चर्चा सुरू असताना सुरक्षा रक्षक अधिकारी ठाकूर यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, त्याला कडू यांनी आक्षेप घेत शिष्टमंडळावर दबाव टाकणाऱ्या ठाकुर यांच्यावर करवाई करण्याची मागणी करताच ते गर्भगळीत झाले आणि चिमणीसारखा चेहरा पाडून बसले.
राज्य शासन, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा अंकुश नसल्याची बतावणी करत शाळा प्रशासन स्थानिकांना अंधारात ठेवत असल्याने कडू यांनी शैक्षणिक खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा तर प्रशासनाचा सुतकी चेहरा झाला होता.
या शिष्टमंडळात कांतीलाल कडू, आर. डी. घरत, माजी सरपंच बी. आर. परदेशी, दिलीप परदेशी, संजय परदेशी, राजन चिखलेकर, शमी मढवी, सागर परदेशी, प्रकाश मढ़वी, अरविंद घरत, श्याम मढवी, नवनाथ मांगलूरकर, किरण म्हात्रे, संजय चिखलेकर आदींचा समावेश होता.