नवी मुंबई – जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगच्यावतीने सहावा मोफत भव्य रोजगार मेळावा म्हणजेच मेगा जॉब फेअर शुक्रवार दिनांक ४ मे २०१८ रोजी भरविण्यात येणार आहे. कोपरखैरणेच्या सेक्टर ८मधील रा.फ.नाईक विद्यालयात हा मेळावा सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने हा लोकोपयोगी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यंदाचे या मेळाव्याचे सहावे वर्ष आहे. या मेळाव्यात स्थानिक कंपन्यांमधून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळत असल्याने या कंपन्यांमध्ये उमेदवार टिकण्याची टक्केवारी देखील वाढली आहे.
बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी या रोजगार मेळाव्यात उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहेत. जानेवारी २०१२ पासून या रोजगार मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात सहभागी कंपन्या आणि उमेदवारांची संख्या वाढते आहे. जानेवारी २०१२ मध्ये ४००० उमेदवारांनी सहभाग घेतला होता त्यापैकी १००० उमेद्वारांना रोजगारप्राप्त झाला होता. जुलै २०१२ मध्ये ५००० उमेदवार सहभागी झाले होते त्यापैकी १५०० उमेदवारांना रोजगार मिळाला होता. मे २०१३ मध्ये ७००० उमेदवारांनी सहभाग घेतला होता. २०३७ उमेदवारांना रोजगार मिळाला होता. जानेवारी २०१४ मध्ये ८००० उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी २३८७ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील रोजगार मिळाला होता. केवळ सदृढ उमेदवारांनाच नव्हे तर अपंग आणि गतिमंद उमेदवारांना देखील या मेळाव्यामधून रोजगाराचा आधार मिळाला आहे. यावर्षी या मेळाव्यात विविध क्षेत्रातील ५०० कंपन्यांची नोंदणी झाली आहे.
या वर्षीच्या मेळाव्यात देखील यशस्वी मुलाखतीसाठी मार्गदर्शन सेमिनार होणार आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. जे उमेदवार काही कारणास्तव रोजगार मिळविण्यास पात्र ठरणार नाहीत त्यांना जीवनधाराच्यावतीने ऐरोलीत ३६५ दिवस कार्यरत जॉब असिस्ट सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करुन रोजगार मिळविण्यास मदत केली जाणार आहे. आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने ऐरोली येथे २५ एप्रिल २०१३ पासून हे सेंटर सुरु करण्यात आले असून त्यामधून रोजगार इच्छुक उमेदवारांना व्मक्तीमत्व विकास, मुलाखतीचे कौशल्य, अधिक चांगल्या नोकर्या कशा मिळवाव्यात, संवाद कौशल्य, सादरीकरण आदींविषयी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येते.
ज्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी मेळाव्यासाठी येताना सोबत ७ पासपोर्ट आकाराचे फोटो, बायोडेटाच्या ७ प्रती आणि निवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्ड सोबत आणणे आवश्यक आहेे. मेळाव्यासाठी प्रवेश मोफत आहे. मेळावापूर्व नावनोंदणीसाठी ८६९१८९८०६७ किंवा ०२२-४०१२६३०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोफत रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेळाव्याचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.