दीपक देशमुख
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील महाव्यवस्थापक पद गेल्या पाच वर्षापासून रिक्त आहे. हे पद रिक्त असतानाही ते भरले जात नाही. परंतु सध्या जे प्रभारी महाव्यवस्थापकपदी आहेत. त्यांचे पद अबाधित राहावे म्हणून परिवहन प्रशासनाने कुणाचीही परवानगी न घेता एका माजी अधिकार्याला वर्षाला लाखो रुपये मानधन देऊन सल्लागारपदी निवड केली आहे. त्यामुळे परिवहन विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.ज्यांनी हे कृत्य आहे केले त्यावर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी सर्वधर्मसमभाव सामाजिक संस्थेचे संस्थापक संतोष सैदाने यांनी केली आहे.
एनएमएमटी प्रशासनात सध्या ४८३ बसेस उपलब्ध आहेत. एनएमएमटीच्या प्रमुखपदी आतरिक्त जिल्हाधिकारी पदाचा अधिकारी महाराष्ट्र शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पाठविला जातो. २०१३ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवर अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले मांगले हे एनएमएमटी मध्ये महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. मांगले यांची बदली झाल्यानंतर उपअभियंता पदावर कार्यरत असलेले शिरीष आदरवाड यांनी आपले राजकीय वजन वापरून शासनाचा आदेश नसताना कार्यकारी अभियंता म्हणून आपली नियमबाह्य निवड करून घेतली व त्यानंतर थेट एनएमएमटीच्या महाव्यवस्थापकपदी विराजमान झाले. २०१३ पासून आजपर्यंत शिरीष आदरवड हेच प्रभारी महाव्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. खरे म्हणजे महाव्यवस्थापक पदावर महाराष्ट्र शासनाचा अधिकारी मागावणे हे गरजेचे असल्याचे संतोष सैदाने यांनी सांगितले.
मागील दोन महिन्यांपूर्वी एनएमएमटी प्रशासनाने कुणालाही न विचारता तसेच परिवहन मंडळ व महासभेत कोणताही प्रस्ताव न आणता महिन्याकाठी ६५ हजार रुपये मानधन देवून एसटी महामंडळाच्या अमहाव्यवस्थापकपदी कार्यरत असणार्या माजी अधिकारी बाळासाहेब जाधव यांना सल्लागारपदी निवड केली आहे. त्यामुळे सल्लागारपदी नियुक्त केलेल्या जाधव यांना तात्काळ हाकला अशी मागणी संतोष सैदाने यांनी केली आहे.
एनएमएमटी प्रशासन दिवसाकाठी रोज १० लाख रुपये तोट्यात आहे.जर नियमानुसार प्रतिनियुक्ती वर शासनाचा अधिकारी आला असता तर सल्लागार नेमण्याची वेळ आली नसती व सल्लागाराला दिले जाणारे मानधनही वाचले असते.परंतु हे असे का होत नाही?यामागे गौडबंगाल काय आहे?याची खुद्द आयुक्तांनी चौकशी करावी अशीही मागणी संतोष सैदाने यांनी केली आहे . याबाबत परिवहन सभापती प्रदीप गवस यांना विचारले असता,याबाबत मला काहीही माहिती नसून चौकशी करून कार्यवाही करतो असे सांगितले.