टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
मुंबई :- भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
आज टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी खा. चव्हाण यांनी हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून तेरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी दोन चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करित आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. देशाला भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी भाजपला सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन काँग्रेस पदाधिका-यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. भाई जगताप, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, रमेश शेट्टी, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा , सचिव राजाराम देशमुख, मनिष गणोरे, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस संजय तायडे पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.