अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा अवघ्या ३ धावांनी पराभव केला आणि पंजाबच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला. अॅण्डय़्रू टायच्या भेदक माऱ्यानंतर लोकेश राहुल आणि आरोन फिंच यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब विजय मिळवेल असे चित्र होते. मात्र, १९व्या षटकात राहुल बाद होऊन माघारी परतला आणि मुंबईचा विजय निश्चीत झाला.
दुसरीकडे, प्लेऑफसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात पराभव झाल्याने पंजाबच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. पंजाबच्या पराभवासाठी चाहत्यांनी धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग आणि कर्णधार रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाला जबाबदार धरलं आहे. युवराज जेव्हा खेळपट्टीवर आला त्यावेळी पंजाबला विजयासाठी ९ चेंडूंमध्ये २० धावांची आवश्यकता होती. युवराज केवळ तीनच चेंडू खेळला आणि त्यामध्ये केवळ १ धाव तो करु शकला. परिणामी पंजाबला पराभाचा सामना करावा लागला. पंजाबचा पराभव होताच युवराज सिंगवर पंजाबचे चाहते चांगलेच संतापले. सोशल मीडियामध्ये युवराजवर चाहत्यांनी राग व्यक्त केला. अनेकांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला त्याला दिला. युवराजच्या काही चाहत्यांनी त्याचा बचाव करताना अश्विनला पराभवासाठी जबाबदार धरलं. कर्णधार अश्विनने अक्षर पटेलला युवीच्या आधी फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी तोंडसूख घेतलं. बराच वेळ ट्विटरवर युवराज सिंग ट्रेंड होत होता.