कांतीलाल कडू, घरत यांच्या लढ्याचे फलित
पनवेल: स्थानिकांच्या मुलांना शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या केंद्रीय विद्यालयाने अखेर नांगी टाकली आहे. 24 पैंकी 18 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असल्याची यादी आज सायंकाळी, शाळेच्या फलकावर लावण्यात आली आहे. उर्वरित मुलांनांही प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली आहे.
मुजोर प्रशासनाने ओएनजीसी केंद्रीय विद्यालयात स्थानिकांच्या 24 मुलांना खड्यासारखे बाजूला काढून प्रवेश नाकारला होता. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष आर. डी. घरत, दिलीप परदेशी यांनी पनवेल संघर्ष समितीला साकडे घालून न्यायासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.
संघर्ष समितीने प्रकल्पग्रस्त संघटना आणि स्थानिकांना सोबत घेवून प्रशासनासोबत बैठक घेतली होती. कांतीलाल कडू यांनी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला होता. याशिवाय आर. डी. घरत यांच्यासोबत उपोषण छेडत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर ओएनजीसी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने 15 दिवसात मुलांना प्रवेश देतो, असे लेखी आश्वासन द्यावे, असा रेटा लावत कडू आणि घरत यांनी आंदोलन तीव्र केले होते. त्यानुसार ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापक प्रभाकर घरत यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले होते. त्या लेखी आश्वासनाप्रमाणे त्यांनी 18 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. 24 पैंकी सहा जणांना डावलले गेले आहे. त्यामुळे ठिणगी पाडण्याची शक्यता ओएनजीसी प्रशासनाच्या अद्याप लक्षात येत नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत लढा पुन्हा सुरू ठेवू असे कांतीलाल कडू यांनी सांगितले आहे.