हॉटेल पाम्स अटलांटिक मधील अनधिकृत पोटमाळा निष्कासित
नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक मोहिमा राबविल्या जात असून अनधिकृत बांधकामे, रस्ते – पदपथांवरील फेरीवाले, मार्जिनल स्पेसचा गैरवापर, विनापरवानगी होर्डींग – बॅनर्स यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. मोहन डगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे व परिमंडळ 1 विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली, वाशी विभागाचे विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके, तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे यांनी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने ही धडक मोहीम पार पाडली.
वाशी व तुर्भे विभागातील कोपरी गांव येथे पामबीच रोडलगत असलेल्या रस्ते व पदपथावर चार चाकी गाड्या अनधिकृतपणे उभ्या केल्या जात होत्या. या रस्ते व पदपथावर गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा व नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे याठिकाणी उभ्या करण्यात येत असलेल्या गाड्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी व तुर्भे विभाग कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये 20 गाड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली असून एकूण 28 हजार 300 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये 3 टोईंग व्हॅन, 15 लेबर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे तुर्भे सेक्टर 19 डी, सतरा प्लाझा येथील हॉटेल पाम्स अटलांटिक हुक्का पार्लर मध्ये अनधिकृत पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्याबाबत संबंधितांना एम.आर.टी.पी. कायद्यामधील कलम 53(1) अन्वये रितसर नोटीसही देण्यात आली होती. तथापि याबाबत कोणतीही दखल संबंधितांनी घेतली नाही वा स्वत:हून पोटमाळा काढला नाही त्यामुळे आज तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी पथकाने 15 कामगार व गॅस कटरच्या सहाय्याने पोटमाळा निष्कासित केला व 30 हजार रूपये रक्कम वसूल केली. या मोहिमेत 15 कामगारांसह 2 गॅस कटरच्या सहाय्याने ही धडक कारवाई करण्याती आली. यापुढील काळातही अशाप्रकारच्या धडक कारवया आठही विभागांमध्ये करण्यात येणार आहेत.