नवी मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सीबीडी बेलापूर सेक्टर – 8 येथील स्पंदना महिला उद्योगाचे उदघाटन बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. तसेच स्पंदना महिला उद्योगामध्ये अनेक नाना प्रकारचे पदार्थ कुडया, शेवया, 12 प्रकारचे पापड, घरगुती मसाले, लोणचे आणि शोभेच्या वस्तू व आपापल्या आवडीचे पदार्थ, घरगुती पदार्थ तयार करून विक्रीसाठी ठेवले जात आहेत. त्यामुळे गरीब गरजू, निराधार मागासलेल्या महिलांना उपजिविकेसाठी स्पंदना महिला उद्योग हा महिलांसाठी एक व्यासपीठ तयार झाले असून एकछत्री स्वत:चं अस्तित्व स्थापन करण्याची आणि सामूहिकरीत्या एकत्रित येऊन यशस्वी उद्योग उभं करण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. उद्योगात उतरताना अशी उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून पुढे गेल्यास त्यातून स्त्रीला प्रेरणा मिळेल ज्यामुळे या स्त्रिया पुढे स्वत:च्या पायावर उभे राहून स्वतःचे व्यवसाय चालू करू शकतील.
तसेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. ‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’. झपाट्याने आपल्या समाजातील तिची प्रतिमा बदलू लागली आहे. स्त्री ही केवळ ‘चूल आणि मूल’ एवढंच आपलं विश्व सीमित न ठेवता आज घराबाहेर पडली आहे. आपल्या कर्तृत्वाचा झेंडा तिने सातासमुद्रापार पोहोचवला आहे. स्त्री घराबाहेर पडून नोकरी करू लागली आहे. वेगवेगळ्या जबाबदार्या लीलया पेलू लागली. या पुरुषप्रधान समाजात तिने संघर्षाने स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे स्त्रीने स्वतंत्र उद्योग यातही स्वत:ला उभं केलं आहे, परंतु स्त्रियांचे उद्योगातील अस्तित्व नगण्य आहे एवढं मात्र नक्की. याचमुळे आपल्या देशात स्त्रीयांना उद्योगात जास्त वाव आहे. जास्तीत जास्त महिलांनी उद्योगाकडे वळणं ही काळाची गरज आहे तसेच उद्योग म्हणजे उद्योजकाचे मूल असते आणि एक मूल वाढवणं म्हणजे त्यावर योग्य संस्कार करून सक्षम करणे हे प्रत्येक उद्योजकाचे कर्तव्य असते आणि त्याचसाठी सतत अभ्यास करत राहणं, नवनवीन गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच स्पंदना महिला उद्योगामुळे गरीब व गरजू स्थानिक महिलांना रोजगार निर्माण होत असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच स्पंदना महिला उद्योगाला बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्पंदना महिला उद्योगाच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणी पळसकर, पंचायत समिती सदस्य सौ. रत्नप्रभा घरत, भारतीय महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा सौ. विद्याताई तामखडे व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.