नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मनपा स्वच्छता अभियान राबवत आहे. त्यामध्ये मनपाने अव्वल क्रमांक मिळाला असताना वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व टेस्ट मैदान कोसो दूर असल्याचे अस्वच्छतेवरून स्पष्ट होत आहे.स्वच्छता अभियानाचा विचार करता संबंधित विभागाने स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
तुर्भे सेक्टर १९ मधील दाणा मार्केटमध्ये उप प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रवेश करतानाच दोन्हीही बाजूला पान, गुटखा खाऊन भिंती रंगविलेल्या आहेत. तसेच दुकानदार,नागरिकांनी टाकलेला कचरा कुठेही पडल्याचे दिसत आहे. नागरिकांसाठी असणारी स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. या ठिकाणी स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गधी येत आहे. पाण्याचा कुलर बंद असल्यामुळे अस्वच्छ झाल्याचे दिसून येत आहे.
ज्या ठिकाणी नागरिकांची टेस्ट घेतली जाते तिथे कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. ज्या ठिकाणी वाहन जप्त केली आहेत ,तिथे कमालीचे गवत पसरले आहे. या मैदानावरील स्वच्छतागृहे ही अस्वच्छ आहेत. कचरा भरलेली कचरा कुंडी आडवी पडल्याची दिसत आहे. मैदानाच्या प्रवेशालाच डेब्रिज ठेवण्यात आले आहे. त्यामुळेे या मैदानावर अवकळा पसरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.
उपप्रादेशिक कार्यालयाची ही दोन्ही ठिकाणे स्वच्छ करण्यास दोन दिवसही लागणार नाहीत. परंतु संबंधित कार्यालयाच्या मनात हे का येत नाही असाही सवाल कामानिमित्त आलेले नागरिक विचारत आहेत. पूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबविले जात असताना शासनाचाच एक भाग असलेल्या परिवहन विभाग स्वच्छतेबाबत दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.