ग्रीन होपच्या वतीने जागतिक पर्यावरणदिन साजरा
नवी मुंबई :- नवी मुंबईतील आगरी आणि कोळी बांधवांचा मत्सव्यवसाय हे उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. मात्र अनेक वर्षापासूनचा त्यांचा मासेमारी आणि खेकडेपालन हा व्यवसाय कांदळवन आणि शासनाच्या जाचक अटींमुळे धोक्यात आला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबादारी पार पाडणार्या आगरी-कोळी समाज बांधवांना मच्छिमारी बरोबरच जोड व्यवसाय देण्याच्या अनुषंगाने पाणथळ योजना सुरु करण्यात येणार आहे. या बाबत राज्य शासनाने सप्टेंबर २०१७ मध्ये अध्यादेश (जी.आर.) काढून ही योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याचे निश्चित केले आहे. वन विभाग, कांदळवन संवर्धन विभाग आणि स्थानिक मच्छिमार यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक गावातून एक समिती गठीत करण्यात येणार असून रोजगाराभिमुख होण्यासाठी नवी मुंबईतील आगरी आणि कोळी समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.
नवी मुंबईतील पर्यावरण रक्षणात भरीव कामगिरी करणार्या ग्रीन होप या सामाजिक संस्थेच्यावतीने यंदाही सलग १३व्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐरोली दिवागाव येथील खाडीकिनारी झालेल्या या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आमदार नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला नवी मुंबई मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष चंदन मढवी, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, वन विभागाचे अधिकारी मयुर बोथे, प्रकाश चौधरी आदींसोबतच एन.एस.एस.चे विद्यार्थी देखील उपस्थित होते.
आमदार नाईक यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ऐरोली खाडी किनार्याचा पर्यावरणीय विकास करण्याच्या अनुषंगाने मोलाचे प्रयत्न करण्यात आले आहे. ऐरोलीला लाभलेला अंथाग सागरी किनारा पाहता सागरी पर्यटनाला चालना मिळावी, येथील समृध्द जैवविविधतेचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी आमदार नाईक यांच्या प्रयत्नांतून राज्यातील पहिले जैव विविधता केंद्र ऐरोलीत साकारले आहे. या केंद्राला आतापर्यंत हजारो पर्यटकांना भेट दिली आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी ई-टॉयलेट बांधण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येथील जेटीचा लवकरच विकास करण्यात येईल, अशी माहितीही आमदार नाईक यांनी दिली.
ग्रीन होपच्या माध्यमातून सुरु असलेला मागील १३ वर्षापासूनच्या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला यश आले असून रबाळे, एमआयडीसी, ऐरोली आदी झोपडपट्टीचा, डोंगराळ भाग आणि खाडीचा भाग हरित बनला आहे. या यशाबददल आमदार नाईक यांनी यांनी ग्रीन होपसह या उपक्रमात सहभागी होणार्या विविध सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचे पर्यावरणदिनी आवर्जुन कौतुक केले आहे.