* आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश * महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांज बरोबर बैठक संपन्न
नवी मुंबई :- नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हे लवकरात लवकर सुरु करणेबाबत पाठपुरावा करण्याकरिता तसेच कुकशेत गावातील ग्रामस्थांच्या घरांना वाढीव चटई क्षेत्र, प्रॉपर्टी टॅक्स, गावातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण केंद्र अशा विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. सदर बैठकीत नवी मुंबईतील अनेक विविध समस्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता श्री. मोहन डगावकर, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, नगररचना संचालक श्री. ओवैस मोमीन उपस्थित होते. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करीत असलेल्या नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून उद्यापासूनच सिटीसर्व्हेला सुरुवात होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन.यांनी बैठकीत सूचित केले. यामुळे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत करून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक केले. तसेच कुकशेत गावातील वाढीव एफ.एस.आय. चा मुद्दा व कुकशेत ग्रामस्थांच्या घरातील प्रॉपटी टॅक्स शहरी देयकाप्रमाणे न लावता गावठाण देयकाप्रमाणे लावण्यात यावे व गावातील महिलांना महिला सक्षमीकरण केंद्र उपलब्ध करून देणे अशा विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच नवी मुंबईतील संक्रमण शिबिराचा प्रस्ताव, फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन), नवी मुंबईतील प्रत्येक गावाला एक गाव, एक कमान उभारणे, बेलापूर व नेरूळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात इंक्युबीटर सेवा उपलब्ध करणे, दिवाळे गावातील मच्छीमार्केट मागील बाजूस स्थलांतर करून रस्त्याचे रुंदीकरण करणे,तुर्भे नाका येथे कामगारांसाठी स्वच्छता गृहे, नळ जोडणी व निवारा शेड, पात्र झोपडपट्टी धारकांचे फोटो पास, वाहन पार्किंग, नवी मुंबईमध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय, सानपाडा येथे स्वतंत्र विभाग कार्यालय, नेरूळ से-15 मार्केट, वाशी येथील भाजी मार्केट, उरण फाटा येथील आदिवासी यांना घरे, पाणी पुरवठा व रस्ता उपलब्ध करणे, सीवूड्स सेक्टर – 50 येथील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उपलब्ध करणे, अशा अनेक विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हे व्हावा व त्यांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे याकरिता मी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला होता. सदर बाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, सिडको एम.डी. यांजबरोबर बैठका घेतल्या होत्या. सदर विषय हा माझा जिव्हाल्याचा असल्याने मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हे उद्यापासून सुरु होत असल्याने मला आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच कुकशेत गावातील ग्रामस्थांच्या घरांना वाढीव एफ.एस.आय. देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली असून त्यांच्या घरांना येणारे मालमत्ता कर हे शहरी देयका प्रमाणे न देता ते गावठाण देयका प्रमाणे देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. तसेच कुकशेत गावातील महिलांना महिला सक्षमीकरण केंद्र उपलब्ध करून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) लवकरच निर्माण होणार असून दिवाळे गावातील मच्छीमार्केट मागील बाजूस स्थलांतर करून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची कामे सुरु असून त्याकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून 10 कोटी निधी उपलब्ध करण्यात आले असून महापालिका प्रशासनाच्या अधिपत्याखाली 25 लाख निधी देणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. पात्र असलेल्या झोपडपट्टी धारकांना फोटोपास वितरण सुरु झाले असून ज्या धारकांनी फोटो पास करिता जे काही शुल्क भरले असल्यास शुल्काची पावती दाखवून फोटो पास घेण्यात यावे असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
यावेळी विजय घाटे, डॉ. राजेश पाटील, नगरसेवक सुनील पाटील, कुकशेत गावातील ग्रामस्थ, उरण फाटा येथील आदिवासी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते.