मुंबई : राज्यभरात प्लास्टिक बंदीचा निर्णय २३ जून पासून लागू करण्यात आला. तेव्हापासूनच हा निर्णय वादात आहे. प्लास्टिकचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला. तसेच प्लास्टिक वापरावर ५ हजारांपासून २५ हजारांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली. २३ जून ते २ जुलै या कालावधीत मुंबई महापालिकेने १ कोटी ९६ लाख ५ हजारांची दंड वसुली केली आहे. एवढेच नाही तर १५०७ किलो प्लास्टिकही जप्त केले आहे.
प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली होती. हा निर्णय निवडणूक निधी जमा करण्यासाठी घेण्यात आला असे वक्तव्य त्यांनी केले होते. एवढेच नाही तर मुख्यमंत्री प्लास्टिक बंदीवर काहीच का बोलत नाहीत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तसेच प्लास्टिक बंदी लोक तेव्हाच स्वीकारतील जेव्हा त्याला काहीतरी पर्याय आणला जाईल, असेही वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. प्लास्टिकबंदीच्या निर्णयावरून रामदास कदम यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. तर रामदास कदम यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
प्लास्टिक बंदीचा निर्णय होऊन आता ९ दिवस उलटले आहेत. ९ दिवसात मुंबईतून १५०७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि १ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.