नवी मुंबई :- नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्य सेवेत गती व अधिक भर पडावी यासाठी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सर्व सुविधांयुक्त अशा 2 रुग्णवाहिकेचे लोकापर्ण सोहळा नुकताच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व माजी विरोधी पक्षनेते श्री. पंढरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते न.मुं.म.पा. हॉस्पिटल, सेक्टर-20, बेलापूर गाव येथे पार पडला. सदर रुग्णवाहिका या नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर गाव व नेरूळ येथील माता बाळ रुग्णालयात कार्यरत असणार आहेत. सदर लोकार्पण सोहळ्यास नगरसेवक सुनील पाटील, मिथुन पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता घंगाळे, शैलजा पाटील, विनोद सोनटक्के तसेच न.मु.म.पा. उपायुक्त रमेश चव्हाण, कर्मचारी अधिकारी वर्ग, ज्येष्ठ नागरीक महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, रुग्णवाहिका या आपल्या जीवनवाहिन्या असून नवी मुंबईतील नागरिकांना सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर गाव व नेरूळ येथील माता बाळ रुग्णालयात सर्व सुविधांयुक्त अशा 2 रुग्णवाहिका माझ्या आमदार निधीतून देण्यात येत आहेत. गेल्या वर्षी पालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात अशीच सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. माझ्या माध्यमातून एकूण 3 रुग्णवाहिका नवी मुंबईतील नागरिकांना आरोग्य सेवेकरिता उपलब्ध करून दिल्याने समाधान वाटत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. हृदयविकार, गर्भवती महिला, अपघात, अर्धांगवायु, विषबाधा, आगीत भाजणे अशा अत्यवस्थ रुग्णांना अशा परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याकरिता वेळेत अॅम्ब्युलन्स उपलब्ध होणे गरजेचे असते. आर्थिक दुर्लभ, गरिबांना चांगली सेवा देणे तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या सेवेत अधिक गती व भर पडावी यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयास आमदार निधीतून रुग्णवाहिका दिल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले कि, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या तीनही रुग्णालयांना सुसज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने नवी मुंबईतील नागरिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. त्यांना आरोग्य सेवा सुलभ होणेकरिता सदर रुग्णवाहिकांची आवश्यकता होती. सदर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने आरोग्य सेवा सर्व रुग्णांपर्यंत जलद पोहचण्यास मदत होईल असेही सांगण्यात आले.