मुख्यमंत्र्यांचा निर्णयाचे “मनसे” स्वागत, तात्काळ जमीनीवरील ताबा, तंबू व सुरक्षा रक्षक हटवावे, मनसेची मागणी
नवी मुंबई : खारघर येथील ८ कोयनाग्रस्त शेतकर्यांना पुनर्वसन म्हणून २४ एकर जमीन देण्यात आली. परंतु यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर मनसेने याला जोरदार विरोध केला होता. या शेतकर्यांना ओलिस धरून पोलिस बळाचा गैरवापर करून त्यांच्याकडून १७०० कोटी बाजारमूल्य असणारी जमीन अवघ्या ३ कोटीत घेऊन रातोरात बिल्डर मनीष भतिजा व त्याचा भागीदार संजय भालेराव यांच्या नावे करण्यात आली.
सदर जमीन विकत घेणारा बिल्डर व भाजप आमदार प्रसाद लाड यांचे लागेबंध असल्याचे कळते. यासंदर्भात मनसेने आक्रमक पवित्रा घेत न्यायालयीन चौकशी करावी व तात्काळ या जमीन व्यवहाराला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ज्या लोकांना जिल्हाधिकार्यांचे नाव देखील माहीत नाही तसेच शेकडो कोयना प्रकल्पबाधित जमिनीच्या प्रतीक्षेत असताना, त्या आठ शेतकर्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्या जमिनीचा ताबा देखील न देता त्या खरेदी करून सरकारी यंत्रणा राबवून, ताबा मिळवून देणारे जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचे तात्काळ निलंबन करावे. तसेच राजकीय वरदहस्ताने सरकारी, यंत्रणेचा गैरवापर करणार्या बिल्डर मनीष भतिजा व संबंधितांवर फौजदरी गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.
तसेच न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर मालकीचा ताब बिल्डर कडून काढून घ्यावा व मोकळ्या जागेवरील तंबू, सुरक्षा रक्षक, मालकी हक्काचा नामफलक त्वरित हटवावा अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने कार्यवाही करेल असा इशारा रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.